VIDEO: नितीन गडकरींची प्रकृती अस्वस्थ, भर सभेत आली भोवळ 

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 27, 2019 | 19:11 IST | ऊमेर सय्यद

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शिर्डीतील प्रचार सभेत भोवळ आली असल्याचं प्राथमिक वृत्त नुकतंच हाती आलं आहे.

nitin gadkari shirdi_times now
नितीन गडकरींची प्रकृती अस्वस्थ, भर सभेत आली भोवळ  |  फोटो सौजन्य: Times Now

शिर्डी: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिर्डीत आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्टेजवरच भोवळ आली. शिर्डीत आल्यापासूनच गडकरींना अस्वस्थ वाटत होतं. सभेच्या ठिकाणी आल्यापासून गडकरींना दोनदा लिंबू पाणी देखील देण्यात आलं होतं. पण भाषण करताना त्यांना अचानक भोवळ आल्यासारखं झालं. त्यामुळे त्यांना तात्काळ कार्यकर्त्यांनी धरून खुर्चीत बसवलं.  त्यानंतर गडकरींना तात्काळ एक गोळी देण्यात आली. काही वेळाने गडकरींना बरं वाटल्याने त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हात उंचावून आपण ठीक असल्याचं सांगितलं. त्यानंतर ते काही मिनिटातच सभा स्थळाहून शिर्डीतील साईबाबा मंदिरात गेले तिथे दर्शन घेतल्यानंतर ते नागपूरला रवाना झाल्याचं समजतं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. 

शिर्डीत शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी गडकरी हे शिर्डी मतदार संघात प्रचार सभा घेण्यासाठी आले होते. शिर्डीत २९ तारखेला मतदान पार पडणार आहे. दरम्यान, शिर्डी येथे आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी नितीन गडकरी सभेस संबोधित करण्यासाठी भाषण देण्याकरिता उठले असता त्यांना  भोवळ आली. पण आता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं समजतं आहे.  

शिर्डीत आज तब्बल ४४ अंश सेल्सियस एवढं प्रचंड तापमान आहे. या भयंकर उकाड्यामुळेच गडकरींना अस्वस्थ वाटत असल्याचंही म्हटलं जात आहे. दरम्यान, गडकरी अचानक खाली बसल्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही घबराट पसरली होती. पण नंतर गडकरींची प्रकृती स्थिर असल्याचं समजताच सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर गडकरी थेट नागपूरला रवाना झाले. यानंतर पुन्हा एकदा डॉक्टर त्यांची तपासणी करणार आहेत. सुरुवातीला उष्णतेमुळे थोडासा अशक्तपणा जाणवत होता पण आता आपली प्रकृती उत्तम असल्याचं खुद्द गडकरींनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं आहे.

याआधीही गडकरींना अहमदनगरमध्ये आली होती भोवळ

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अहमदनगरमधीलच एका कार्यक्रमादरम्यान गडकरींना व्यासपीठावर चक्कर आली होती. अहमदनगरमधील राहुरी येथे कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यासाठी गडकरी आले होते. त्यावेळी राज्यपाल विद्यासागर राव हे देखील उपस्थित होते. याच कार्यक्रमादरम्यान त्यांना चक्कर आली होती. त्यावेळी त्यांना तातडीने उपचारासाठी डॉक्टरांकडे नेण्यात आलं होतं. पण आज पुन्हा एकदा तसाच काहीसा प्रकार झाल्याने कार्यकर्तेही चिंतेत पडले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी