VIDEO: शिवसेना आमदाराच्या गाडीत सापडली रोकड, मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 29, 2019 | 12:59 IST | Times Now

Cash seized in Shiv Sena leader car: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. मात्र, त्याच दरम्यान शिवसेना आमदाराच्या गाडीत रोकड सापडली आहे. पैसे वाटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय.

Cash seized from Shiv Sena leader car in Palghar
शिवसेना आमदाराच्या गाडीत सापडली रोकड  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र मतदानाला सुरूवात झाली आहे. मात्र, त्यापूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांच्या गाडीत रोकड सापडली आहे. मतदानाच्या काही वेळ आधी हा प्रकार घडला आहे. मुंबई जवळ असलेल्या पालघर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. 

मतदारांना पैसे वाटून त्यांची मतं विकत घेत असल्याचा आरोप आमदार रवींद्र फाटक यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण १७ लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये पालघर लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. शिवसेना-भाजप मधील जागावाटपमध्ये पालघर मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला आला. पालघर मतदारसंघात शिवसेनेकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव त्यांच्या विरोधात रिंगणात आहेत. पालघर लोकसभा निवडणूक ही शिवसेनेसाठी अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची आहे.

यापूर्वी रविवारी, नवी मुंबईत मतदारांना पैसे वाटत असलेल्या दोन जणांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेले कार्यकर्ते हे शेकापचे असल्याची माहिती समोर आली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांना हे पैसे वाटप करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांचं नाव प्रताप आरेकर असं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासाठी पैसे वाटप करत असल्याचा आरोप प्रताप आरेकर याच्यावर आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर, शिर्डी या मतदारसंघांचा समावेश आहे. यापूर्वी महाराष्ट्रात ११ एप्रिल, १८ एप्रिल आणि २३ एप्रिल अशा तीन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर देशभरातील लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी