Bhupinder Singh : मुंबई : काल सुप्रसिद्ध गायक भुपिंदर सिंग यांचे निधन झाले. खर्जातल्या धीरगंभीर आवाजाच्या बळावर उडत्या चालींच्या गाण्यांसह गझल गायकीतही त्यांची स्वत:ची अशी अमीट मुद्रा उमटवली होती. दीर्घ आजारपणाने ग्रासलेले भुपिंदरजी 82 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेते अनुपम खेर यांना भुपिंदर सिंग यांच्या निधानाने फार दुःख झाले असून त्यांनी सिंग यांच्यासाठी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. सिंग यांनी आपल्याला संघर्षाच्या काखात मदत केली होती असे अनुपम खेर यांनी म्हटले आहे.
कलेच्या क्षेत्रात संघर्ष कुठल्याच कलावंताला चुकला नाही. त्यातही अभिनयाचे क्षेत्र तर अत्यंत बेभरवशाचे आहे. आपल्या याच संघर्षाच्या काळाला उजाळा देत अनुपम खेर या दिग्गज अभिनेत्याने भुपिंदर सिंग या दिग्गज गायकाला श्रद्धांजली वाहिली आहे. भुपिंदर यांच्या दोन गाण्यांशी जोडलेल्या हळव्या आठवणी खेर यांनी स्वदेशी सोशल मीडिया अॅप 'कू'वर पोस्ट करत सांगितल्या आहेत.
खेर लिहितात, "प्रसिद्ध गायक भूपेंद्र सिंह यांच्या निधनाविषयी ऐकून खूप दु:ख झाले. त्यांची सगळीच गाणी मला आवडतात. पण “एक अकेला इस शहर में... आणि दिल ढूंढता है…” या दोन गीतांनी मुंबईतल्या सुरवातीच्या काळात काम शोधताना मला सतत बळ दिलं. खूप साध्या स्वभावाचे होते भुपिंदरजी! ओम् शांति!"
पार्श्वगायक आणि गझलगायक म्हणून नावाजले गेलेल्या भुपिंदर यांनी गायलेलं पहिलं गाणं होतं, ते 'हकीकत' सिनेमामधलं 'होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा...' बॉलिवुडला एक नवा उबदार, मधाळ आवाज मिळाला. त्यानंतर एकाहून एक सुरेख गाण्यांमधून भुपिंदर यांनी भावनांना सुरांचा साज चढवला. 'मेरे घर आना जिंदगी...', 'किसी नजर को तेरा...', 'आज बिछडे है...', 'मेरा रंग दे बसंती चोला...' ही त्यातली काही उल्लेखनीय.
1940 साली पंजाबच्या अमृतसरमध्ये जन्मलेले भुपिंदर सिंग गायक म्हणून लोकप्रिय झालेच, पण ते कसलेले गिटारवादकही होते. 'दम मारो दम'सारख्या तुफान गाजलेल्या गाण्यांमधली गिटारची जादू होती भुपिंदर यांची! जगभरातले संगीतप्रेमी या प्रतिभावंताच्या निधनामुळे शोक व्यक्त करत आहेत.