वादळासाठी अक्षयचा मुंबईकरांना मोलाचा सल्ला, पाहा व्हिडिओ

झगमगाट
Updated Jun 03, 2020 | 13:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने सर्व मुंबईकरांना तसेच लोकांना या चक्रीवादळाला कसे तोंड देता येईल याचा व्हिडिओ एक ट्विटरवर शेअर केला आहे.

akshay kumar
आणखी एका वादळाला तोंड देऊया – अक्षय कुमार 

थोडं पण कामाचं

  • अक्षय कुमारने सर्व मुंबईकरांना केले अलर्ट
  • अक्षय म्हणतोय, आणखी एका वादळाला तोंड देऊया
  • घरात सुरक्षित राहण्याचा अक्षयचा लोकांना सल्ला

मुंबई: निसर्ग चक्रीवादळाचा मोठा धोका महाराष्ट्रासमोर आहे. कोरोनाच्या संसर्गाची भीती एकीकडे असतानाच आणखी एक निसर्गाचे संकट येऊन ठेपले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक मुंबईकर घरात बसले आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने सर्व मुंबईकरांना तसेच इतर लोकांना या चक्रीवादळाला कसे तोंड देता येईल याचा व्हिडिओ एक ट्विटरवर शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडिओ मुंबई महापालिकेने आपल्या ट्विटर हँडलवरही शेअर केला आहे. यात अक्षय कुमार मुंबईकरांना आणखी एका वादळाला तोंड देण्यासाठी सज्ज राहू असा संदेश देत आहे.

अक्षय या व्हिडिओमध्ये म्हणतो, आज मुंबईमध्ये पाऊस पडतोय. दरवर्षी आपण या पावसाची वाट पाहत असतो.मात्र यंदाचा हा पाऊस वेगळा आहे. हा पाऊस खूपच त्रासदायक वाटतो आहे. या पावसाची मजाही घेता येत नाही आहे. देवाची आपल्यावर दया असेल तर कदाचित हा धोका कमीही होऊ शकतो. वादळाची तीव्रता कमी असू शकते. वादळ जरी आले तरी आपण मुंबईकर घाबरणारे नाहीत. आपली सुरक्षा आपल्याला करायला हवी. यासाठी बीएमसीनेही तयारी केली आहे. फक्त काही गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे आणि त्यांचे पालन केले पाहिजे आणि आणखी एका वादळाला तोंड देऊया.

घरातून बाहेर पडू नका, समुद्रकिनारी जाऊ नका, बाहेर असाल तर सुरक्षित ठिकाणी जा, झाडाच्या खाली उभे राहू नका, कमकुवत इमारतींचा आसरा घेऊ नका, घरात गरज नसेल तेव्हा इलेक्ट्रिसिटी आणि गॅस बंद करा, बाल्कनीमध्ये हलक्या वस्तू ठेवू नका, कुंड्या घरात बाल्कनीमध्ये असतील तर त्या घरात ठेवा. मेणबत्ती, खाण्याचे थोडेफार सामान जवळ ठेवा. १९१६ वर कॉल करून बीएमसीला कळवा. अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही प्रकारचे मेसेजेस माहिती नसल्याशिवाय फॉरवर्ड करू नका. घाबरू नका, या वादळाशी तोंड देण्यास सज्ज व्हा. वादळच तर आहे तुमचा समजूतदारपणा आणि सावधानता बाळगून हे संकटही दूर करूया.

मुंबई महापालिकेनेही हे ट्विट रिट्वीट करत अक्षय़चे आभार मानले आहेत. अक्षय नेहमीच मुंबईकरांच्या मदतीला धावून येत असतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी