'महिलेला शिवीगाळ करणाऱ्या बिचुकलेंवर कारवाई करा', भाजपच्या माजी नगरसेविकेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

झगमगाट
Updated Jun 20, 2019 | 12:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

बिग बॉस मराठी सीझन २ मध्ये स्पर्धक अभिजीत बिचुकले यांनी प्रतिस्पर्धी रुपाली भोसले हिला शिवीगाळ केल्याने आता भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी बिचुकलेंवर कारवाईची मागणी केली आहे.

Bigg Boss Marathi Veena opens up on her sweet tooth
(फोटो सौजन्य: instagram/facebook) 

मुंबई: बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सध्या जोरदार राडा सुरु आहे. प्रत्येक स्पर्धक हा दुसऱ्या पेक्षा वरचढ होण्याचा प्रयत्न करत आहे. पण यामुळे आता या घरातील स्पर्धक ताळतंत्र सोडून वागत असल्याचं समोर येत आहे आणि यामुळेच ते मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. होय.. बिग बॉसच्या घरात यंदाच्या सीझनमध्ये अभिनेत्यांसह अभिजित बिचुकले या राजकीय नेत्याचाही समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीला चांगला खेळ करत असल्याचं प्रमाणपत्र खुद्द महेश मांजरेकर यांच्याकडून मिळाल्यानंतर आता या घरात बिचुकले मात्र चांगलेच सुटले आहेत. पण यामुळेच त्यांना आता घरातून काढून टाकण्याची मागणी होत आहे. ही मागणी कुण्या स्पर्धकाने केलेली नसून भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी केली आहे. ती देखील थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. त्यामुळे आता बिचुकलेंवर बिग बॉस कारवाई करणार की, सरकार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

बिग बॉसच्या घरातील अभिनेत्री रुपाली भोसले हिला शिवीगाळ केल्याप्रकरणी माजी नगरसेविका रितू तावडे यांनी बिचुकलेंना बाहेर काढून टाकावं अशी मागणी केली आहे. यामुळे बिचुकले अडचणीत येण्याची शक्यता आहे. यासंबंधी एक पत्र देखील रितू तावडे यांनी मुख्यमंत्री आणि राज्य महिला आयोगाला दिलं आहे. 'बिचुकले यांनी रुपाली भोसले यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टिप्पणी केली. त्यामुळे त्यांनी फक्त रुपाली भोसले यांचाच नव्हे तर घटस्फोटित महिला, सिंगल मदर यांचा अपमान केला आहे. त्यामुळे आयोजकांसह बिचुकलेंवर कारवाई करण्यात यावी.' अशी मागणी रितू तावडे यांनी केली आहे. 

 

 

दरम्यान, रितू तावडे यांनी यावेळी आंदोलनाचा इशाराही दिली. 'अशा पद्धतीच्या वक्तव्यामुळे माझ्यासारखं अनेक महिलांचं मन दुखावलं गेलं आहे. त्यामुळे या प्रकारासंबंधी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं असून स्थानिक पोलीस स्थानकात तक्रारही नोंदवणार आहे. जर याबाबत गंभीर दखल घेतली गेली नाही तर मी आंदोलन देखील करेन.' असं रितू तावडे यावेळी म्हणाल्या.  

अभिजित बिचुकले यांनी नेमकं केलं होतं? 

१८ जून २०१९ रोजी प्रसारित झालेल्या भागात बिग बॉस मराठीच्या घरात एका टास्क दरम्यान रुपाली भोसले हिने अभिजित बिचुकले यांच्यावर बरीच टीका केली. सुरुवातीला बिचुकले यांनी रुपालीचे आरोप खोडून काढण्याचा बराच प्रयत्न केला. यावेळी रुपाली सतत बिचुकलेंना डिवचण्याचा प्रयत्न करत होती. कारण की, टास्कमधील बिचुकलेंची जागा तिला हवी होती. रुपालीने यासाठी बरेच प्रयत्न केले. बिचुकले खोटं बोलतात वैगरे सारखे अनेक आरोप तिने यावेळी केले. पण तरीही बिचुकले आपल्या जागेवरुन हलले नाही. पण त्याचवेळी रुपाली हिने बिचुकले तुम्ही तुमच्या मुलीची शपथ घ्या असं म्हटलं. 

रुपालीने असं म्हणताच बिचुकले यांना संताप अनावर झाला. त्यांनी थेट रुपालीवर वैयक्तिक टीका करण्यास सुरुवात केली. रुपाली हिच्या घटस्फोटाबाबतही ते बरंच काही बोलले. त्यासोबतच त्यांनी बरीच शिवागाळ देखील केली. बिचुकले एवढं काही बोलले की, तिथे 'बीप' टाकावे लागले. हे सगळं होत असताना बिचुकलेंनी आपली जागा सोडली होती. हिच संधी घेत रुपाली हिने बिचुकलेंची जागा पटकावली. यामुळे बिचुकले आणखीनच संतापले आणि रुपालीला अद्वातद्वा बोलू लागले आणि थेट खेळ सोडून घरात निघून गेले. 

 

 

दरम्यान, कार्यक्रमाचे निवेदक महेश मांजरेकर यांनी अनेकदा बिचुकले यांना भाष जपून वापरण्याचा सल्ला दिला होता. पण तरीही यावेळेस बिचुकलेंनी आपली मर्यादा सोडलीच. त्यामुळे आता त्यांच्यावर काही कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

दुसरीकडे काल (बुधवार) प्रसारित झालेल्या भागात रुपाली भोसले आणि अभिजित बिचुकले यांनी परवा घडलेल्या प्रकाराबाबत एकमेकांची माफीही मागितली. पण आता हे प्रकरण थेट सरकार दरबारी पोहचल्याने बिचुकलेंचं नेमकं काय होणार? याकडेच प्रेक्षकांचे डोळे लागून राहिले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
'महिलेला शिवीगाळ करणाऱ्या बिचुकलेंवर कारवाई करा', भाजपच्या माजी नगरसेविकेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार Description: बिग बॉस मराठी सीझन २ मध्ये स्पर्धक अभिजीत बिचुकले यांनी प्रतिस्पर्धी रुपाली भोसले हिला शिवीगाळ केल्याने आता भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी बिचुकलेंवर कारवाईची मागणी केली आहे.
Loading...
Loading...
Loading...