मुंबई: सर्वच विवाह सुंदर असतात. परंतु, जेव्हा एखादे जोडपे लोकांसाठी प्रेरणा ठरते तेव्हा तो लग्नसमारंभ आणखी खास बनतो. दिया मिर्झा आणि वैभव रेखी यांनी आपल्या लग्नात असेच काम केले आहे. १५ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकलेल्या या जोडप्याचे लग्न साध्या पद्धतीत पार पडले आणि गरज नसलेली कोणतीच गोष्ट केली जाणार नाही याची दक्षता घेतली गेली.
नव्या नवरीने समाज माध्यमावर आपल्या लग्नाची माहिती शेअर करत सांगितले की, त्यांनी लग्नात कोणत्याच गोष्टीचा अपव्यय होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. दियाने लिहिले, 'आमच्या लग्नाचे सर्व विधी एका महिला पुजारीने केले आहेत. इतकेच नाही तर, बदलाची सुरूवात कोणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय होत नाही. त्यामुळेच, कन्यादान आणि बिदाईलाही नकार देण्याचा निर्णय आम्ही घेतला.’ अभिनेत्री पुढे सांगते की, ‘मागील १९ वर्षे मी ज्या बागेत जायचे तिथले वातावरण जादुई होते. तिच आमच्या साध्या लग्नासाठी उत्तम जागा होती. आम्ही कोणत्याच प्लास्टिक आणि कचऱ्याशिवाय पूर्ण समारंभ पार पाडल्याचा आम्हाला अभिमान आहे. सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तू बायो-डिग्रेडेबल आणि नैसर्गिक होत्या.'
दियाच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'असा विवाह ही एक सौभाग्यपूर्ण आणि आनंदाची गोष्ट आहे. आम्ही मनातून अशी आशा करतो की अनेक जोडप्यांनी अशाप्रकारे लग्न करायला हवे. प्रेम, कुतूहल, विश्वास यांची जादुई ऊर्जा, कोमलता आणि जीवनाप्रतीची सहानुभूती हे स्रीच्या आत्म्याचे भाग आहेत. स्त्रीने आपल्यातली शक्ती, दिव्यता आणि जे काही जुनाट आहे, त्याला नवे रूप देण्याची ही वेळ आहे.
याआधीही दिया नवरी म्हणून आपल्या सुंदर आणि साधारण पोशाखासाठी चर्चेत होत्या. भरजरी कपडे सोडून अभिनेत्रीने साधी, लाल रंगाची रेशमी साडी निवडली होती. त्यासोबतच, दागिन्यांनी आपला पोशाख पूर्ण केला होता.