राज्यात चित्रपट, मालिकांच्या शूटिंगचा मार्ग मोकळा

आता निर्मात्यांना निर्मिती पूर्वीची आणि निर्मितीनंतरची कामे शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार करता येतील.

maharashtra government allowed shooting of movie serials with norms rules regulation check full details in marathi
राज्यात चित्रपट, मालिकांच्या शूटिंगचा मार्ग मोकळा (फाईल फोटो) 

थोडं पण कामाचं

 • चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणास नियमांच्या अधीन राहून परवानगी
 • नियमांचा भंग केल्यास शूटिंग बंद करण्यात येणार
 • मुख्यमंत्री कार्यालयाची प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती

मुंबई: गेल्या आठवड्यात मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार तसेच ब्रॉडकाकास्टिंग फाऊंडेशनचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टी ठप्प झाली असून चित्रीकरणास परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. आज यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध केला असून चित्रपट, दूरचित्रवाणी  मालिका, ओटीटी मालिका यांच्या चित्रीकरणास काही अटी व शर्तींच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे.

यानुसार आता निर्मात्यांना निर्मिती पूर्वीची आणि निर्मितीनंतरची कामे शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार करता येतील. निर्मात्यांनी याप्रमाणे काळजी घेऊन चित्रीकरण करावयाचे असून नियमांचा भंग झाल्यास कामे बंद करण्यात येतील असेही यात म्हटले आहे. कोविड संदर्भात लागू केलेल्या प्रतिबंधातील सुचना यासाठी लागू राहतील. 

या चित्रीकरण कामांसाठी निर्मात्यांना मुंबईकरीता व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव येथे तसेच उर्वरित जिल्ह्यांसाठी त्या-त्या जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागेल. 

राज्य सरकारकडून अनलॉक १ ची नियमावली जाहीर 

केंद्र सरकारने अनलॉक १ जाहीर केल्यानंतर आता रविवारी राज्य सरकारने सुद्धा अनलॉक १ ची नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीत कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे. तर उर्वरित भागात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार आहेत.

 1. राज्यात टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात येणार 

 2. कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार 

 3. अनलॉकचा पहिला टप्पा ३ जूनपासून सुरू होणार  

 4. अनलॉकचा दुसरा टप्पा ५ जूनपासून सुरू होणार 

 5. अनलॉकचा तिसरा टप्पा ८ जूनपासून सुरू होणार 

 6. कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी सरकारी कार्यालये सुरू होणार 

 7. १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू करण्याची मुभा 

 8. १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत खासगी कार्यालय सुरू करण्याची मुभा

 9. रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार 

 10. कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाला 

 11. चेहऱ्यावर मास्क लावणे आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणे अनिवार्य

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी