मुंबई : मुंबईमधील एका फाइव्ह स्टार हॉटलेमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून राज्याचे नगरविकासमंत्री मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाला सुरुवात होताच जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं... असं म्हणत स्टेजवर प्रसाद ओकची एन्ट्री झाली. तो समोरुन येताच मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसादचे अक्षरशः पाय धरले. त्याला कारण होतं प्रसादने केलेला मेकअप. शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या वेशात आल्याने मंत्री शिंदे यांना आपण आनंद दिघे यांनाच समोर पाहत आहोत, असा भास झाला. (Minister in the Thackeray government Eknath Shinde greeted the actor, tears in his eyes at the memory of Dharmaveer)
ठाणे आणि शिवसेना यांचे एक वेगळ नातं आहे. त्यातही तत्कालीन शिवसेना नेते आनंद दिघे हे आजही शिवसैनिकांसाठी पुजनीय आहे. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या राजकीय गुरुबद्दलचा आदर अनोख्या पद्धतीने व्यक्त केल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर प्रसादनेही आनंद दिघे ज्याप्रमाणे खांद्यावर हात ठेऊन कार्यकर्त्यांसोबत फोटो काढायचे तसाच फोटो एकनाथ शिंदेंसोबत काढला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दिघे यांची जीवनगाथा मांडणाऱ्या धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा मोठ्या उत्साहात पार पडले. या सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे तसेच सिनेमाचा निर्माता मंगेश देसाई यांनी केली आहे.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, गुरुवर्य आनंद दिघे यांचा आदेश शिवसैनिकांसाठी शिरसावंद्य होताच, पण त्यांचं सोबत असणं देखील प्रत्येक शिवसैनिकाला भक्कम आधार देणारं होतं, ते होते म्हणून मी आज इथे आहे असे भावोद्गार यासमयी बोलताना व्यक्त केले. याप्रसंगी खासदार राजन विचारे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेता क्षितिज दाते, झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील, शशिकांत जाधव, हेमंत पवार, सर्व जुने जाणते शिवसैनिक, धर्मवीर सिनेमातील सर्व कलावंत तंत्रज्ञ उपस्थित होते.