Pankaja Munde : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) पक्षाकडून डावललं गेल्याची चर्चा असणाऱ्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) या आता नव्या इनिंगसाठी (New Innings) सज्ज झाल्या असून लवकरच त्या नव्या रुपात महाराष्ट्रासमोर येणार आहेत. राजकारणाच्या मेन इनिंगसोबत आता त्यांनी आणखी एका नव्या इनिंगकडे आपला मोर्चा वळवला आहे. ‘झी मराठी’ या वाहिनीवरील ‘उंच माझा झोका’ या नावाने होणाऱ्या पुरस्कार सोहळ्याचं (Award Show) सूत्रसंचालन (Anchoring) यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे करणार आहेत. त्यांच्यासोबत अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) यादेखील सूत्रसंचालकाची जबाबदारी पार पाडणार आहेत. येत्या रविवारी या दोघींच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी महाराष्ट्रातील प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
झी मराठीच्या मंचावर प्रेक्षकांना नेहमी प्रेरणा देणारे कार्यक्रम सादर होत असतात. ह्या वर्षी देखील ‘मला अभिमान आहे’ हे ब्रीद घेऊन स्त्री कर्तृत्वाचा सन्मान म्हणून ‘उंच माझा झोका' या नेत्रदीपक सोहळयाचे सादरीकरण होणार आहे. 'उंच माझा झोका' पुरस्काराचे यंदाचं हे आठवं वर्ष आहे. आपल्या कार्याने समाजाला सुदृढ वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा यावेळी गौरव करण्यात येईल. ह्यावर्षीच्या पुरस्काराचे खास आकर्षण म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा पंकजा मुंडे आणि क्रांती रेडकर सांभाळणार आहेत. पंकजा मुंडे आणि क्रांती रेडकर ह्या दोघींची जुगलबंदी ह्या कार्यक्रमात रंगत आणेल याचा निर्मात्यांना विश्वास आहे. सोबतच कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान आणि कलाकारांचे धमाकेदार नृत्याविष्कार अनुभवण्यासाठी झी मराठी वाहिनीवर २८ ऑगस्टला संध्याकाळी सात वाजता प्रसारित केले जाणार आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात डावललं जात असल्याची भावना पंकजा मुंडेंची आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या नाराज असून वेगवेगळ्या मार्गाने त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. अनेकदा जाहीर सभांमधून आपला संयम सुटत चालल्याचे संकेतही त्यांनी दिले होते. महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे गटाचं सरकार स्थापन झाल्यानतंर त्यात पंकजा मुंडेंची वर्णी लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्यांच्यासह एकाही महिलेला मंत्रिपदी स्थान मिळालेलं नसल्यामुळे पंकजा मुंडे तुलनेनं फ्री असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे एक नवा प्रयोग म्हणून ही संकल्पना त्यांना भावली असून महिलांसंबंधीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आपली एक वेगळी आणि सकारात्मक प्रतिमा महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी त्या उत्सुक आहेत.
अधिक वाचा - Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीवर दुःखाचा डोंगर, सर्वात जवळच्या व्यक्तीनं घेतला जगाचा निरोप
कोंबडी पळाली तंगडी धरून या गीतातील नृत्यामुळे महाराष्ट्राला परिचित झालेली अभिनेत्री क्रांती रेडकर पंकजा मुंडेंसोबत सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. क्रांती रेडकरचे पती समीर वानखेडे यांना बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात नुकतीच क्लीनचिट मिळाली होती. हे प्रकरण गाजत असताना क्रांती रेडकरने आपल्या पतीच्या समर्थनासाठी किल्ला लढवला होता. त्यानंतर आता पंकजा मुंडेंच्या सोबतीनं सूत्रसंचालनाचा किल्ला लढवण्यासाठी ती सज्ज झाली आहे.