राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी आणि शेअर बाजारातील झोल... इनसायडर ट्रेडिंगसंदर्भात राज आणि शिल्पाला सेबीचा दंड

झगमगाट
विजय तावडे
Updated Jul 29, 2021 | 23:35 IST

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्यावर एकामागून एक वेगवेगळे आरोप होत आहेत. पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेला राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीवर आता इनसायडर ट्रेडिंगच्या आरोपाखाली दंड आकारण्यात आला आहे.

Raj , Shilpa & Insider trading
राज, शिल्पा आणि शेअर बाजारातील झोल 
थोडं पण कामाचं
  • राज कुंद्रा आणि शिल्पाला सेबीचा ३ लाखांचा दंड
  • राजची कंपनी कंपनी वियान इंडस्ट्रीज लि. वर पुरेशा माहितीचा अभाव आणि इनसायडर ट्रेडिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली ३ लाख रुपयांचा दंड
  • सप्टेंबर २०१३ ते डिसेंबर २०१५ या कालावधीदरम्यान केले होते ट्रॅन्झॅक्शन

मुंबई: राज कुंद्रा (Raj Kundra)आणि त्याची पत्नी, बॉलीवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Bollywood Actress Shilpa Shetty)यांच्यासमोर अडचणींचा जणू डोंगरच उभा राहिला आहे. त्यांच्यावर एकामागून एक वेगवेगळे आरोप होत आहेत. पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेला राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीवर आता इनसायडर ट्रेडिंगच्या आरोपाखाली दंड आकारण्यात आला आहे. सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने म्हणजे सेबीने (SEBI)राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी आणि त्यांची कंपनी वियान इंडस्ट्रीज लि. (Viaan Industries Ltd)वर पुरेशा माहितीचा अभाव आणि त्याचबरोबर इनसायडर ट्रेडिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली ३ लाख रुपयांचा दंड आकारला आहे. वियान इंडस्ट्रीजची नोंदणी शेअर बाजारात (Share market) झाल्यानंतर नियमांचे पालन झालेले नाही. (Raj Kundra : SEBI issues penalty of Rs 3 lakh to Raj Kundra & Shilpa Shetty for insider trading case)

राज कुंद्रा आणि शिल्पाला सेबीचा ३ लाखांचा दंड

सेबीने दिलेल्या आदेशानुसार त्यांच्यावर एकूण ३ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. हा दंड राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांना संयुक्तरित्या भरायचा आहे. शिल्पा आणि राज कुंद्रा वियान इंडस्ट्रीजचे प्रवर्तक आहेत. सेबीने हा आदेश सप्टेंबर २०१३ ते डिसेंबर २०१५ या कालावधीदरम्यान करण्यात आलेल्या तपासानंतर केला आहे. सेबीने या कंपन्यांची चौकशी इनसायडर ट्रेडिंगच्या नियमांच्या उल्लंघनासंदर्भात केली होती. 

काय आहे हे प्रकरण?

ऑक्टोबर २०१५ मध्ये वियान इंडस्ट्रीजने चार लोकांना ५ लाख शेअर्स अॅलॉट केले होते. याशिवाय राज आणि शिल्पा या दोघांना प्रत्येकी २.५७ कोटी रुपयांचे प्रत्येकी १,२८,८०० शेअर्स देण्यात आले होते. यासंदर्भात त्यांच्याकडून स्पष्टीकरण आवश्यक होते, कारण याचे मूल्य १० लाख रुपयांपेक्षा जास्त होते. इनसायडर ट्रेडिंग प्रतिबंधक नियमांनुसार हे आवश्यक होते. सेबीने म्हटले आहे की इनसायडर ट्रेडिंग प्रतिबंधक नियमानुसार हे स्पष्टीकरण तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीनंतर करण्यात आला. 

राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

न्यायालयाने राज कुंद्राचा जामिन अर्ज फेटाळला आहे. कोर्टाने राज कुंद्रा आणि रयान थोर्पेच्या जामिन अर्जावर सुनावणी केली होती, मात्र राज कुंद्राच्या वकिलांच्या युक्तिवादावर कोर्ट समाधानी नव्हते. त्यामुळे त्याचा जामिन अर्ज फेटाळण्यात आला होता. पॉर्नोग्राफी प्रकरणात कोर्टाने राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रॅंचने १९ जुलैला अटक केली होती. अटकेपासून राज पोलिस कोठडीत हे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे राजच्या विरोधात सबळ पुरावे आहेत. या प्रकरणात शिल्पा शेट्टीला अद्याप क्लीन चीट देण्यात आलेली नाही. सध्या पोलिस राज कुंद्राच्या कंपनीच्या बॅंक खात्यांचा तपास करत आहेत. शिल्पा राजच्या वियान इंडस्ट्रीजमध्ये संचालक होती. त्याचबरोबर ज्या बॅंक खात्यामध्ये पॉर्न फिल्म्सच्या व्यवसायाचा पैसा येत होता, त्याचा वापर शिल्पादेखील करत होती. यामुळेच शिल्पा शेट्टीला अद्याप या प्रकरणातून क्लीन चीट मिळालेली नाही.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी