मुंबई : अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित केल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. राजच्या अटकेचं कारण बनलं ते व्हॉट्स अपवरील चॅट. या चॅटकडे मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा मुख्य पुरावा म्हणून पाहत आहे. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कु्ंद्राला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याची अटक केली.
या चॅटमध्ये राज कुंद्रा प्रदीप बख्शी नावाच्या व्यक्तीशी चित्रपटातील कमाईविषयी चर्चा करत असल्याचं आढळून आले आहे. या चॅटमध्ये चित्रपटातील कमाई आणि नुकसानाविषयी चर्चा केली गेली आहे. या अश्लील चित्रपटातून राज दररोज लाखो रुपये कमावत असल्याचं निदर्शनात आले आहे.
मुंबई पोलिसांनी राज कुंद्रला आणि अजून एका आरोपीला रायन जॉन थार्पला मुंबईच्या एस्प्लानेड न्यायालयता हजर करण्यात आले. न्यायालयाने 23 जुलैपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
राज यांनी केलेल्या चॅटमध्ये अनेक खुलासे झाले आहेत. राज चॅटमध्ये म्हणाले की, मिळकतीसाठी ते या आठवड्यात चित्रपट प्रदर्शित करत आहेत. 10 ते 15 अभिनेत्रींना पेमेंट उशिरा झाल्याची चर्चाही त्यांनी आपल्या व्हॉट्स अप चॅटमध्ये केली आहे. यामुळे मुंबई पोलीस या व्हॉट्सअप चॅटशी संबंधीत इतर लोकांचीही येत्या काही दिवसात चौकशी करतील. मुंबई पोलिसांनी सोमवारी राज कुंद्राला चौकशीसाठी बोलवलं होतं. काही तास चौकशी केल्यानंतर राजला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याची वैद्यकीय चाचणी देखील केली. दरम्यान राजने त्याच्याविरोधात लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. जामीन मिळण्यासाठी राज कुंद्रा न्यायालयाकडे धाव घेणार का नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान राज कुंद्रा कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तो अशाप्रकारच्या वादात सापडलेला आहे..