अमेरिकेत ३१ जानेवारीला होणार असलेला ग्रॅमी अॅवॉर्ड सोहळा पुढे ढकलला

अमेरिकेतील लॉस अँजेलीस येथे रविवार ३१ जानेवारी २०२१ रोजी होणार असलेला ग्रॅमी अॅवॉर्ड सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोना संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला.

2021 Grammy Awards shift to March due to corona
अमेरिकेत ३१ जानेवारीला होणार असलेला ग्रॅमी अॅवॉर्ड सोहळा पुढे ढकलला 
थोडं पण कामाचं
  • अमेरिकेत ३१ जानेवारीला होणार असलेला ग्रॅमी अॅवॉर्ड सोहळा पुढे ढकलला
  • कोरोना संकटामुळे ग्रॅमी अॅवॉर्ड सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय
  • अमेरिकेत २ कोटी १५ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची बाधा आणि ३ लाख ६५ हजारांपेक्षा जास्त मृत्यू

लॉस अँजेलीस (Los Angeles): अमेरिकेतील (United States) लॉस अँजेलीस येथे रविवार ३१ जानेवारी २०२१ रोजी होणार असलेला ग्रॅमी अॅवॉर्ड सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोना (Corona) संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला. आता परिस्थितीचा आढावा घेऊन हा सोहळा मार्च महिन्यात घेण्याबाबत विचार सुरू आहे. (2021 Grammy Awards shift to March due to corona)

ग्रॅमी अॅवॉर्ड सोहळ्याची पुढील तारीख अनिश्चित

गायन, संगीत या क्षेत्रांसाठी ग्रॅमी अॅवॉर्ड दिले जातात. आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्रॅमी अॅवॉर्ड हा बहुमान समजला जातो. ग्रॅमी अॅवॉर्ड सोहळा मार्चमध्ये घेण्याचा विचार करत असल्याचे सुतोवाच आयोजकांनी केले. मात्र सोहळ्याच्या आयोजनाची नवी तारीख परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य वेळी जाहीर करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

लॉस अँजेलीसमध्ये कोरोनामुळे दर तासाला सहा मृत्यू

अमेरिकेतील कॅलिफोर्निया (California) प्रांतात कोरोना संकटाची तीव्रता वेगाने वाढत आहे. कॅलिफोर्निया प्रांतातील लॉस अँजेलीस काउंटी येथे कोरोनाममुळे दहा हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले. अमेरिकेतील तीन प्रांतांमध्ये २५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या तीन प्रांतांमध्ये कॅलिफोर्निया प्रांताचा समावेश आहे. लॉस अँजेलीसची लोकसंख्या ४० लाखांच्या घरात आहे आणि तिथे दर तासाला कोरोनामुळे सहा मृत्यू होत आहेत.

लॉस अँजेलीस काउंटीमध्ये १० हजार ८५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू

ताज्या आकडेवारीनुसार कॅलिफोर्नियाच्या चार कोटींच्या घरात असलेल्या लोकसंख्येपैकी २.४९ दशलक्ष नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील २७ हजार ३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्निया प्रांतातील लॉस अँजेलीस काउंटीमध्ये ८ लाख २८ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी १० हजार ८५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जगात ८ कोटी ६८ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची बाधा, १८ लाखांपेक्षा जास्त​ मृत्यू

जगात आतापर्यंत ८ कोटी ६८ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील १८ लाखांपेक्षा जास्त नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगात सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद अमेरिकेत झाली आहे. अमेरिकेत आतापर्यंत २ कोटी १५ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील ३ लाख ६५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

कोरोनाचा नवा घातक अवतार सक्रीय, जगाच्या चिंतेत वाढ

कोरोनाच्या मूळ विषाणूमध्ये (Corona Virus) चार हजारपेक्षा जास्त वेळा बदल (म्युटेशन / mutation) झाले आहेत. मागील काही दिवसांत प्रचंड वेगाने विषाणूच्या रुपात बदल झाले. प्रत्येक स्वरुपातला विषाणू हा संसर्ग वाढवत आहे. संसर्ग वेगाने वाढवणारे कोरोना विषाणूचे हे ताजे अवतार जगातील अनेक देशांमध्ये पसरण्यास सुरुवात झाली आहे. परिस्थिती चिंताजनक होत आहे. याच कारणामुळे तीव्र होत असलेल्या कोरोना संकटाची दखल घेऊन आयोजकांनी अमेरिकेतील ग्रॅमी अॅवॉर्ड सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी