Abhishek Bachchan: अमिताभ यांच्यानंतर आता अभिषेक बच्चनलाही कोरोना

Abhishek Bachchan tests positive for Coronavirus: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: अभिषेक बच्चन याने ट्वीट करुन या बाबतची माहिती दिली आहे.

Amitabh Bachchan abhishek bachchan
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन (फाईल फोटो) (फोटो सौजन्य: BCCI) 

थोडं पण कामाचं

  • अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता अभिषेक बच्चनलाही कोरोना
  • स्वत: अभिषेक बच्चन याने ट्वीट करुन दिली माहिती

Abhishek Bachchan: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना कोरोनाची (Corona) लागण झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर आता त्यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यालाही कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: अभिषेक बच्चन याने ट्वीट करुन या बाबतची माहिती दिली आहे. 

बिग बी अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्वीट करुन आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. त्यानंतर आता अभिषेक बच्चन याने सुद्धा ट्वीट करत आपल्याला कोरोना झाल्याचं म्हटलं आहे. अभिषेक बच्चनने ट्वीट करत म्हटलं, "आज माझा आणि वडिलांच्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आम्हाला दोघांनाही अगदी सौम्य लक्षणे होती आणि त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो आहोत. आम्ही या संबंधित अधिकाऱ्यांना सर्व माहिती कळवली आहे. तसेच आमच्या कुटुंबातील सदस्य आणि कर्मचाऱ्यांचीही कोविड टेस्ट करण्यात आली आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, शांत राहा आणि अस्वस्थ होऊ नका. धन्यवाद".

अभिषेक बच्चन याने आणखी एक ट्वीट केलं आहे. दुसऱ्या ट्वीटमध्ये अभिषेक बच्चनने म्हटलं आहे की, आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या संपर्कात आहोत 

अमिताभ बच्चन यांनी केलं ट्वीट

दरम्यान शनिवारी रात्री अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल करण्याचं वृत्त समोर आलं. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत अमिताभ बच्चन यांनी एक ट्वीट केलं. रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. 

अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करुन म्हटलं, "मला कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो आहे. कुटुंबातील सदस्य आणि स्टाफची कोरोना चाचणी करण्यात आली आहे आणि त्यांचे रिपोर्ट अद्याप येणे बाकी आहे. गेल्या १० दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी ही विनंती."

दोघांचीही प्रकृती स्थिर 

रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. नानावटी रुग्णालयात अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांच्या एक टीमच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी