अभिनेता आदित्य पांचोली पुन्हा वादात, अभिनेत्रीच्या बहिणीकडून मारहाण आणि शोषणाचा आरोप

बी टाऊन
Updated May 15, 2019 | 16:46 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

aditya pancholi: अभिनेता आदित्य पांचोलीच्या विरोधात पुन्हा एकदा मारहाण आणि शोषणाचा आरोप लावण्यात आला आहे. हा आरोप बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बहिणीनं केला आहे. जाणून घ्या काय आहे हे नेमकं प्रकरण.

Aditya Pancholi
आदित्य पांचोलीविरोधात पुन्हा मारहाण-शोषणाचा आरोप  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली पुन्हा एकदा वादात अडकला आहे. त्याच्यावर एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बहिणीनं गंभीर आरोप लावले आहेत. मुंबईतील वर्सोवा पोलिसांना आदित्य पांचोली विरोधात ई-मेल द्वारे एक तक्रार मिळाली आहे. यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय. ५४ वर्षीय अभिनेता आदित्य पांचोली विरोधात मारहाण आणि शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. तशी तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतलीय. अभिनेत्रीच्या बहिणीला मारहाण आणि शोषणाची ही घटना अभिनेत्रीचं करिअर जेव्हा सुरू झालं त्या दिवसांतील म्हणजेच एक दशकापूर्वीची असल्याचं सांगितलं जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना जवळपास १३ वर्षांपूर्वीची आहे. आम्हांला एफआरआर दाखल करण्यासाठी खूप पुरावे गोळा करावे लागतील, असं पोलिसांनी सांगितलं. आपल्या ई-मेलमधून तक्रारकर्तीनं तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती आदित्य पांचोलीच्या पत्नीलाही असल्याचं म्हटलं आहे.

 

 

तर या प्रकरणाबद्दल अभिनेता आदित्य पांचोलीनं आपण यापूर्वीच अभिनेत्री विरोधात बदनामीचा खटला दाखल केला असल्याचं म्हटलंय, जो कोर्टात विचाराधीन आहे. आदित्यनं पुढे सांगितलं, ‘मी दाखल केलेला बदनामीचा खटला जर परत घेतला नाही तर माझ्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी ६ जानेवारीला अभिनेत्रीच्या वकीलानं दिली आहे. माझं नशीब चांगलं की मी तिच्या बरोबरची १८ मिनिटांची मिटिंग रेकॉर्ड केलीय आणि तो व्हिडिओ पुरावा म्हणून मी कोर्टात आणि पोलिसांसमोर प्रस्तुत केलाय.’

आदित्य पांचोलीनं पुढे सांगितलं की, हा माझ्याविरोधातील कट आहे. मला आश्चर्य वाटलं जेव्हा या वर्षी २५ एप्रिलला वर्सोवा पोलीस माझ्या घरी एक नोटीस घेऊन पोहोचले. त्याच दिवशी तपास अधिकाऱ्यांना मी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ दाखवला. मी १२ मे रोजी वर्सोवा पोलिसांना आपलं संपूर्ण स्टेटमेंट दिलं आहे आणि आपल्या अर्जासोबत तो व्हिडिओ सबमिट केलाय.

या प्रकरणी वर्सोवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दोन्ही पक्षांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं आणि या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई करण्याचा निर्णय घेऊ.

अभिनेता आदित्य पांचोली विरोधात तक्रारीची ही काही पहिली वेळ नाहीय. यापूर्वीही अनेकदा त्याच्यावर शिवीगाळ, मारहाणीचा आरोप झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी