संजूबाबा लवकरच रासपमध्ये प्रवेश करणार, महादेव जानकरांनीच दिली माहिती 

बी टाऊन
Updated Aug 26, 2019 | 02:47 IST

Actor Sanjay Dutt: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा रासपमध्ये प्रवेश करणार आहे. याबाबतची माहिती स्वत: महादेव जानकर यांनी दिली आहे. 

sanjay Dutt
संजूबाबा लवकरच रासपमध्ये प्रवेश करणार, महादेव जानकरांनीच दिली माहिती   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रासपची जोरदार तयारी 
  • अभिनेता संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार 
  • २५ सप्टेंबरला संजय दत्तचा रासपमध्ये प्रवेश होणार

मुंबई: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा लवकरच कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांचा पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) मध्ये प्रवेश करणार आहे. अशी माहिती स्वत: महादेव जानकर यांनी माध्यमांना दिली आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे आज (रविवारी) आपल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते. त्यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली. मुंबईत आज रासपचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी रासपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मुंबईत आले होते. 

'अभिनेता संजय दत्त हा २५ सप्टेंबरला रासपमध्ये प्रवेश करणार आहे.' अशी माहिती स्वत: जानकर यांनी दिली आहे. महामेळाव्यात बोलताना जानकर असंही म्हणाले की, 'आता सिने इंडस्ट्रीमधील माणसं देखील रासपमध्ये येत आहेत. त्यामुळे आता आम्ही सिने इंडस्ट्रीमध्येही आमचे पाय रोवत आहोत.' दुसरीकडे संजय दत्त यानेही रासपच्या वर्धापनदिनामित्त शुभेच्छा दिल्या आहेत. संजय दत्तने एका व्हिडिओच्या माध्यमातून या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी संजय दत्त असं म्हणाला आहे की, 'महादेव जानकर हे माझे भाऊच आहेत. त्यांना आणि त्यांच्या पक्षाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा.' असा व्हिडिओ संजयने शेअर केला आहे. 

दुसरीकडे, धनगर आरक्षणावरुन राज्यात अनेक मोर्चे काढण्यात आले होते. पण अद्याप धनगर आरक्षण लागू झालेलं नाही. पण जानकर हे मेळाव्यात धनगर आरक्षणाबाबत बोलताना म्हणाले की, सरकारने धनगर समाजाला १  हजार कोटी देऊ केले आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका देखील केली आहे. 'काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात ओबीसीची अवस्था ही कडीपत्त्यासारखी होती.' असं जानकर म्हणाले. 

विधानसभा निवडणूक आता अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपली आहे. अशावेळी आता प्रत्येक पक्षच आपल्या परीने पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच आता रासपने देखील कंबर कसली आहे. जर संजय दत्तने निवडणुकीच्या आधीच रासपमध्ये प्रवेश केल्यास रासपला त्याचा बराच फायदा होण्याची शक्यता आहे. कारण पक्षाला राज्याचा पातळीवर एक सेलिब्रिटी चेहरा मिळेल. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यास देखील मदत होईल. रासप सध्या भाजपसोबत सत्तेत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही रासप भाजपसोबतच राहण्याची शक्यता आहे. यावेळी रासप विधानसभेसाठी भाजपकडे काही जागा वाढवून मागण्याची देखील शक्यता आहे. 

दरम्यान, संजय दत्त हा सुरुवातीपासून नेहमीच चर्चेत राहिला आहे. काही वर्षापूर्वीच त्याने बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षाही भोगली होती.  सिने इंडस्ट्रीमध्ये नाव कमावणारा संजय दत्त हा आता पुन्हा एकदा राजकारणात नाव कमावण्याचा प्रयत्न करणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...