मुंबईः अभिनेत्री कंगना आणि तिची बहीण रंगोली या दोघीजणी आज मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात हजर झाल्या. पोलिसांना भेटून आणि स्वतःचे म्हणणे मांडून नंतर त्या निघून गेल्या. विशिष्ट ट्वीट केल्याच्या प्रकरणात कंगना आणि रंगोलीची पोलिसांनी चौकशी केली. चौकशी पूर्ण झाल्यावर कंगना आणि रंगोली मुंबईतून लगेच निघून गेल्या. कंगना भोपाळमध्ये धाकड सिनेमाच्या शूटिंगसाठी पोहोचली आहे. (actress kangana and her sister questioned by mumbai police)
अभिनेत्री कंगनाने अभिनेता सुशांतच्या मृत्यू प्रकरणात सुरुवातीला मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले. नंतर मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्यावर प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांवर टीका केली. कोरोना प्रश्न हाताळताना हेळसांड झाल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र शासनाच्या कारभाराविषयी प्रश्न उपस्थित केले. आपली भूमिका जाहीरपणे मांडण्यासाठी तिने अनेक ट्वीट केले होते. या घडामोडींनंतर कंगना विरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई केली.
समाजात तेढ निर्माण करणारे ट्वीट केल्याचा, बदनामी केल्याचा आणि देशद्रोहाचा आरोप करत मुंबई पोलिसांनी अभिनेत्री कंगना हिला समन्स बजावले होते. कंगनाच्या भूमिकेला ठाम पाठिंबा देणारे ट्वीट करणारी तिची बहीण रंगोली हिलाही पोलिसांनी समन्स बजावले होते. मात्र कौटुंबिक समारंभाचे कारण देत कंगना आणि रंगोली वारंवार समन्स बजावूनही पोलिसांसमोर हजर झाल्या नव्हत्या. पोलिसांनी दोघींना अटक करण्याची तयारी सुरू केली होती. या विरोधात कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. पोलीस यंत्रणेचा त्रास देण्याच्या उद्देशाने वापर सुरू असल्याचे सांगत कंगनाने तिच्या विरोधात आणि बहीण रंगोली विरोधात सुरू असलेली कारवाई तसेच दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने कंगना आणि रंगोलीला समन्सचा मान राखत स्वतःची बाजू मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात मांडा असे सांगितले. न्यायालयाने कंगना आणि रंगोली यांना अटक करण्यास मनाई करणारा आदेश मुंबई पोलिसांना दिला. यानंतर अभिनेत्री कंगना आणि तिची बहीण रंगोली या दोघींनी आज मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात हजर होऊन स्वतःचे म्हणणे मांडले.
मुंबई पोलिसांनी ८ जानेवारी २०२१ रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत हजर होण्यासाठी कंगना आणि रंगोली या दोघींना समन्स बजावले होते. या समन्सचा मान राखत कंगना आणि रंगोली दुपारी पाऊणच्या सुमारास पोलीस ठाण्यात आल्या होत्या. पोलिसांच्या प्रश्नांना कंगना आणि रंगोलीने उत्तरे दिली तसेच स्वतःची बाजू पोलिसांसमोर मांडली. यानंतर कंगना आणि रंगोली निघून गेल्या.
याआधी अभिनेत्री कंगना हिने एक व्हिडीओ ट्वीट केला. देश विरोधी बोलणाऱ्यांचे कौतुक होते, त्यांचे सत्कार केले जातात. पण देशाच्या बाजूने बोलणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो, असा कंगना म्हणाली. मानसिक छळ करण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर सुरू आहे, अशा स्वरुपाचा आरोप कंगनाने केला.
मुंबई पोलिसांनी समन्स बजावताना गंभीर आरोप केले तरी सुरुवातीला गुन्हा दाखल केला नव्हता. ही बाब लक्षात आल्यावर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात देशद्रोहाचेही एक कलम टाकण्यात आले होते. या प्रकारावरुन मुंबईच्या उच्च न्यायालयाने पोलिसांना जाब विचारला होता. प्रकरण गंभीर होते तर गुन्हा आधी दाखल होणे गरजेचे होते. प्रत्यक्षात समन्सला उत्तर मिळत नाही म्हणून कठोर कारवाईची तयारी सुरू झाल्यावर गुन्हाच दाखल झाला नसल्याचे निदर्शनास आले आणि न्यायदंडाधिकारी अर्थात मॅजिस्ट्रेटने सूचना केली. नंतर गुन्हा दाखल झाला. याच कारणामुळे उच्च न्यायालयाने कंगना आणि रंगोलीला समन्सचा मान राखण्यास बजावतानाच मुंबई पोलिसांना दोघींना अटक करण्याची मनाई करणारा आदेश दिला.