मुंबईः एकतर्फी प्रेमातून अभिनेत्रीच्या पोटात ४ वेळा चाकू खुपसला

Actress Malvi Malhotra Gets Stabbed Four Times With Knife दाक्षिणात्य सिनेमामधून काम केलेली तसेच टीव्ही शो मधून झळकलेली अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर प्राणघातक हल्ला झाला.

Actress Malvi Malhotra Gets Stabbed Four Times With Knife
मुंबईः एकतर्फी प्रेमातून अभिनेत्रीच्या पोटात ४ वेळा चाकू खुपसला 

थोडं पण कामाचं

  • मुंबईः एकतर्फी प्रेमातून अभिनेत्रीच्या पोटात ४ वेळा चाकू खुपसला
  • अभिनेत्री मालवी मल्होत्रा गंभीर जखमी, अंधेरीच्या कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये
  • आरोपी योगेश कुमारचा शोध सुरू, पोलिसांनी दिली माहिती

मुंबईः सुशांतच्या मृत्यूचे रहस्य, बॉलिवूडची ड्रग केस आणि आता एका अभिनेत्रीच्या पोटात चार वेळा चाकू खुपण्याची घटना. मुंबईत एका मागून एक धक्कादायक घटना घडत आहेत. सर्व घटना मनोरंजनसृष्टीशी संबंधित आहेत.

ताजी घटना मुंबईतील वर्सोवा परिसरात घडली. दाक्षिणात्य सिनेमामधून काम केलेली तसेच टीव्ही शो मधून झळकलेली अभिनेत्री मालवी मल्होत्रा (Malvi Malhotra) हिच्या बाबतीत दुर्दैवी घटना घडली. एकतर्फी प्रेमातून मालवीवर प्राणघातक हल्ला झाला. तिच्या पोटात चार वेळा चाकू खुपसण्यात आला.

गंभीर जखमी झालेल्या मालवी मल्होत्राला अंधेरीच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मालवीवर उपचार सुरू आहेत. वेळेत उपचार झाल्यामुळे तिची प्रकृती स्थिर आहे. (Actress Malvi Malhotra Gets Stabbed Four Times With Knife by Yogesh Kumar, Now Stable) 

आतापर्यंत पोलीस तपासात हाती आलेल्या माहितीनुसार, योगेश कुमार (Yogesh Kumar) नावाच्या व्यक्तीने प्रॉडक्शनशी संबंधित कामाचे निमित्त करुन मालवीशी ओळख वाढवली. लग्नाचा प्रस्ताव तिच्यापुढे ठेवला. मालवीने मनोरंजनसृष्टीत करिअर करायचे आहे, लग्नाची घाई करू इच्छीत नाही असे सांगत प्रस्ताव फेटाळला. तिचा नकार योगेशला सहन झाला नाही. 

मालवी घराच्या दिशेने चालत जात असताना योगेश ऑडी कार घेऊन तिच्या समोर आला. मालवीला अडवले. तिने पुन्हा एकदा योगेशला समजावण्याचा प्रयत्न केला. पण योगेशने काही ऐकून घेतले नाही. एकदम खिशातून चाकू काढला आणि मालवीच्या पोटात चार वेळा खुपसला. आसपास गर्दी होत असल्याचे लक्षात येताच योगेश कारमधून पळून गेला. स्थानिकांनी तातडीने जखमी मालवीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 

मालवीवरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांनी मालवीची साक्ष नोंदवली आहे. तिने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तसेच योगेश फेसबुकवरुन सुरुवातीला ओळख वाढवत होता, असे सांगितले. योगेशने २०१९ मध्ये फेसबुकद्वारे मालवीशी संपर्क साधला आणि लवकरच ओळख वाढवली. त्याचा लग्नाचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर मालवीने योगेशला फेसबुकवर ब्लॉक केले होते. पण योगेशने मालवीशी संपर्क साधण्याचा आणि तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मालवीचा विरोध कायम असल्याचे पाहून योगेशने चाकूने हल्ला केला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, योगेश एका सुखवस्तू कुटुंबातील सदस्य आहे. अद्याप या संदर्भात सविस्तर माहिती हाती आलेली नाही. ऑडी कारमधून योगेश सुसाट वेगाने मुंबईबाहेर फरार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. मुंबई पोलिसांनी आसपासच्या अनेक पोलीस ठाण्यांना योगेशविषयीची माहिती दिली असून त्याचा शोध सुरू आहे. योगेशला दिसताक्षणी अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

वर्सोवा पोलिसांना ज्या भागात मालवीवर हल्ला झाला त्या भागातील सीसीटीव्हीचे फूटेज मिळाले आहे. या फूटेजमध्ये घडलेली घटना दिसत आहे. पोलिसांसाठी हा योगेश विरुद्धचा एक मोठा पुरावा आहे. याआधी शनिवारी रात्री नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Control Bureau - NCB) ड्रग केस (Drug Case) प्रकरणी अंधेरीतील वर्सोवा भागात छापा टाकला. फैझल नावाची व्यक्ती टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहान हिला ९९ ग्रॅम गांजा विकत असताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटकेची कारवाई केली. वर्सोवा येथील मच्छीमार कॉलनीत ही कारवाई झाली. फैझल (Faisal) आणि टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहान (Preetika Chauhan) यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने फैझल आणि टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहान या दोघांना ८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. प्रीतिका चौहान हिने काही वर्षांपूर्वी संकटमोचन महाबली हनुमान (Sankatmochan Mahabali Hanuman) या टीव्ही मालिकेत तसेच झमेला (Jhamela) या सिनेमात अभिनय केला आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी