मुंबई: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आता सज्ज झाला आहे ते त्याच्या सुपरहिट सिनेमा हाऊसफुलच्या सीरिझमधला चौथा भाग देण्यासाठी. सिनेमात अक्षयवर चित्रीत अतरंगी आणि धमाल गाणं 'शैतान का साला' नुकतंच रिलीज केलं गेलं आहे. गाणं रिलीज होताच अवघ्या काही वेळातंच सोशल मीडिया वर #BalaChallenge जोरदार ट्रेंड व्हायला सुरुवात झाली. खुद्द अक्षयने हे चॅलेन्ज सगळ्यांना दिलं आणि बघता-बघता सगळीकडून या चॅलेन्जला उत्तम प्रतिसाद मिळाताना दिसला. सध्या सोशल मीडियावर जिथे-तिथे याच चॅलेन्जचा बोलबाला आहे.
गाण्याच्या सिग्नेचर स्टेपने इंटरनेटवर हाहाकार माजवला आहे. अक्षय कुमारच्या फॅन्सनी तर ह्या चॅलेंजला डोक्यावर घेतलंच आहे पण त्याचसोबत अनेक सेलिब्रिटी सुद्धा या चॅलेन्जमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे या गाण्यावरचे व्हिडिओ बनवून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड सुद्धा केले आहेत. रणवीर सिंग, अर्जुन कपूर, वरूण धवन, आयुष्मान खुराना, सिद्धांत चतुर्वेदी आणि वरूण शर्मा, आदी आधी स्टार्सनी #BalaChallenge अॅक्सेप्ट करून त्याचे व्हिडिओ बनवून त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट केले आहेत.
1419 सालची पार्श्वभूमी या गाण्याला असून अक्षयने या गाण्यात बाला ही भूमिका साकारलेली आहे. तसाच तो या गाण्यात काही मुलींसोबत रोमान्स करताना दिसतो आणि छान धमाल डान्स सुद्धा करताना दिसतो. याच गाण्यातील त्याचा सिग्नेचर स्टेप सध्या सगळीकडे लोकप्रिय ठरत आहे. या #BalaChallenge सारखाच सिनेमाला सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळेल असा अंदाज सध्या वर्तवला जात आहे.
धमाल कॉमेडी असलेला हाउसफुल 4 याची कथा पुनर्जन्माच्या अवती-भवती रेखाटली गेली आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, कृती सनॉन, पूजा हेगडे आणि कृती खरबंदा हे सगळे मुख्य भूमिकेत तर दिसतीलच पण त्यासोबतच या सगळ्यांचे डबल रोज सुद्धा सिनेमात बघायला मिळणार आहेत. एक भूमिका असेल सध्याच्या काळातली तर दुसरी असेल 1419 सालच्या काळातली म्हणजे त्यांच्या पुनर्जन्माची. या सगळ्या कथेत बरीच धमाल आणि मज्जा असणार हे काय वेगळं सांगायला नको. साजिद नाडियाडवाला यांच्या नाडियाडवाला ग्रॅण्डसन एंटरटेनमेंट द्वारा प्रस्तुत आणि निर्मित हाउसफुल 4 हा सिनेमा फॉक्स स्टार स्टुडियो द्वारा सह-निर्मित केला गेला आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 25 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर धमाकेदार एंट्री करणार आहे.