बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडल्यानं गेल्या तीन दिवसांपासून ते नानावटी रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांचा यकृताचा त्रास वाढला असल्यानं त्यांना मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास रूग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय.
एका वेबसाईटनं बिग बी रूग्णालयात दाखल झाल्याची बातमी दिली. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, यकृताच्या त्रासामुळे रूग्णालयात घेऊन जावं लागलं आहे. अमिताभ यांनी अलिकडेच स्वतःच्या प्रकृतीबाबत माहिती देताना माझं यकृत 75 टक्के खराब झालं असून केवळ 25 टक्केच यकृत काम करत असल्याचं सांगितलं होतं. 1982 मध्ये कुली सिनेमाच्या शूटिंग दरम्यान झालेल्या दुखापतीपासून त्यांना यकृताचा त्रास सुरू आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अमिताभ यांना मंगळवारी रात्री 2 वाजता रूग्णालयात नेण्यात आलं. नानावटी रूग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या सर्व सुविधा असलेल्या स्पेशल रूममध्ये त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. जेव्हा रूग्णालयातील लोकांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की, बिग बींना जेव्हा रूग्णालयात दाखल केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या प्रकृतीत खूप सुधारणा आहे. त्यांच्या रूमच्या बाहेर 4 गार्ड आहेत आणि त्यांच्या कुटुंबातले आणि नातेवाईक त्यांना बघण्यासाठी येत असतात.
आतापर्यंत अमिताभ, त्यांचं कुटुंब आणि त्यांच्या टीमकडून बिग बी यांच्या रूग्णालयात दाखल असल्याच्या बाबतीत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. झूम. कॉम ला एका सूत्रानं सांगितलं की, अमिताभ बच्चन हे खरोखर रूग्णालयात दाखल आहेत.
दुसरीकडे जरी बिग बी रूग्णालयात दाखल असले तरी ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्यांनी गुरूवारी रात्री अकराच्या सुमारास ब्लॉग लिहिलाय. त्यासोबतच त्याआधी एक दिवस जया बच्चन यांच्यासोबत एक थ्रोबॅक फोटो देखील ट्विट केला. वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झाल्यास, अमिताभ यांचा गुलाबो सिताबो, ब्रम्हास्त्र, चेहरे हे आगामी सिनेमे आहेत.