या दोन प्रसंगांनी बनवले Amitabh Bachchan यांना सुपरस्टार

बी टाऊन
विजय तावडे
Updated Oct 11, 2021 | 15:16 IST

कारकिर्दीत यशाचे शिखर गाठण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी अर्थातच या शहनशाहला खूप मेहनत करावी लागली आहे. सात हिंदूस्थानी या चित्रपटापासून केली होती. करियरच्या सुरूवातीच्या काळात त्यांचे चित्रपट सातत्याने अपयशी ठरत होते.

Amitabh Bachchan's career
अमिताभ बच्चन यांचे करियर 

थोडं पण कामाचं

  • अमिताभ बच्चन यांचा आज ७९वा वाढदिवस
  • अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर त्यांचे चाहते त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गोळा होतात
  • अमिताभ बच्चन यांना देखील यश आणि अपयशाच्या या चढ उतारांमधून जावे लागले

मुंबई: बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)आपल्या अभिनयाच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोचले आहेत. नुसते शिखरावर पोचले आहेत असे नाही तर वर्षानुवर्ष त्यांनी आपले स्थान अढळ ठेवले आहे. जगभर त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. चित्रपटसृष्टीच्या या महानायकाचा आज ७९वा वाढदिवस (Amitabh Bachchan's Birthday)आहे. दरवर्षी अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर त्यांचे चाहते त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गोळा होतात. कारकिर्दीत यशाचे शिखर गाठण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी अर्थातच या शहनशाहला खूप मेहनत करावी लागली आहे. सात हिंदूस्थानी या चित्रपटापासून केली होती. मात्र बॉलीवूडमध्ये (Bollywood) फक्त सुरूवात करून भागत नाही, तिथे आपली वेगळी ओळख निर्माण करावी लागते. अमिताभ बच्चन यांना देखील यश आणि अपयशाच्या या चढ उतारांमधून जावे लागले. पाहूया त्या दोन घटना ज्यांनी अमिताभ बच्चन यांना महानायक बनवले. (These two incidents made Amitabh Bachchan a superstar)

१. पहिल्या हिट चित्रपटातच टोमणा

अमिताभ बच्चन यांच्या करियरच्या सुरूवातीच्या काळात त्यांचे चित्रपट सातत्याने अपयशी ठरत होते. चित्रपट फ्लॉप होत असल्यामुळे अमिताभ बच्चन यांना या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी एका हिट चित्रपटाची नितांत आवश्यकता होती. त्यांची ही गरज पूर्ण केली जंजीर या चित्रपटाने. १९७३मध्ये प्रकाश मेहरा जेव्हा जंजीर हा चित्रपट बनवू इच्छित होते, तेव्हा त्यांना हवे असलेल्या काही मोठ्या सुपरस्टार्सनी हा चित्रपट नाकारला होता. त्यानंतर प्रकाश मेहरा यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर हा जुगार खेळला. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याएवढीच महत्त्वाची भूमिका  सुप्रसिद्ध अभिनेते प्राण यांची होती. चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाल्यावर चित्रपटाचे प्रमोशन सुरू झाले. कोलकाता येथे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्राण येऊ शकले नाहीत. ज्या हॉटेलमध्ये प्रमोशनची पार्टी आणि प्रेस कॉन्फरन्स होती, तिथे सर्वच जण प्राण साहेबांची वाट पाहत होते. त्यावेळेस पत्रकार आणि काही लोकांनी अमिताभ बच्चन यांच्यासमोरच चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांना विचारले की दिग्दर्शक साहेब चित्रपटाचे खरे हिरो कुठे आहे? प्राणसाहेब का नाही आले?

जंजीर चित्रपटात अमिताभ बच्चन हिरोच्या भूमिकेत तर होते मात्र त्यांना हिरो मानण्यास कोणीही तयार नव्हते. पत्रकार आणि पार्टीतील इतर लोकांची ही गोष्ट अमिताभ यांच्या काळजात काट्याप्रमाणे रुतली. अमिताभचे दु:ख प्रकाश मेहरा यांच्या लक्षात आले. प्रकाश मेहरा अमिताभ बच्चन यांना म्हणाले , एकदा हा चित्रपट प्रदर्शित होऊ दे, मग सर्वांना आपोआपच कळेल की चित्रपटाचा हिरो कोण आहे.? प्रकाश मेहरा यांचे म्हणणे खरे ठरले. जंजीर प्रदर्शित झाल्यानंतर जेव्हा अमिताभ बच्चन कोलकाता येथे गेले होते तेव्हा त्यांच्या हॉटेलसमोरील रस्त्यावर अनेक तास ट्रॅफिक जाम झाले होते. त्यानंतर जे घडले तो इतिहासच आहे.

२. आईवडीलांसमोर झाला अपमान

करियरच्या सुरूवातीच्या टप्प्यात जेव्हा अमिताभ बच्चन यांचा संघर्ष सुरू होता. तेव्हा त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन आणि आई तेजी बच्चन त्यांना भेटण्यासाठी मुंबईत आले होते. त्यावेळेस अमिताभ बच्चन यांनी त्यांना स्टुडिओमध्ये नेत शुटिंग दाखवली होती. आपल्या सहकलाकारांची भेट घडवली होती. त्यानंतर तेथून निघताना त्यांनी एक टॅक्सी पकडली. आपल्या मुलाची मेहनत पाहून आईवडील खूश होते. सर्व कुटुंब टॅक्सीत बसून स्टुडिओतून बाहेर पडत होते. तेव्हा एका अनोळखी माणसाने टॅक्सीच्या दरवाज्यावर टकटक केली. हरिवंश राय बच्चन यांनी टॅक्सीची काच खाली केली. त्यानंतर तो माणूस अत्यंत अपमानास्पद पद्धतीने हरिवंश राय बच्चन यांना म्हणाला, टतुमच्या मुलाला अलाहाबाद येथे परत घेऊन जा. याचे इथे काहीच होऊ शकत नाही. हा तर फ्लॉप आहे फ्लॉप."

त्यावेळेपर्यत जंजीर प्रदर्शित झालेला नव्हता. अमिताभ बच्चन यांचे १२ चित्रपट फ्लॉप झालेले होते. आपल्या आईवडीलांसमोरच एवढी कडवट टीका ऐकून अमिताभ बच्चन यांचा चेहरा काळवटला. त्यांना हा आपला नाही आपल्या आईवडिलांचा अपमान वाटला. त्या रात्री अमिताभ बच्चन यांना झोप आली नाही. त्यांनी ठरवले की आता वाटेल तो हो मुंबईत काहीतरी नाव कमावूनच दाखवेन, परत जाणार नाही. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी इतिहास घडवला.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी