मुंबई : अनुपम खेर म्हणजे उत्स्फूर्त अभिनय, विनोदाचे अफलातून टायमिंग आणि वैविध्यपूर्ण भूमिकांनी सिनेरसिकांच्या मनावर राज्य करणारे नाव. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या खेर यांची एक विनोदी पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे.
खेर सोशल मीडियावरही नेहमीच सक्रीय असतात. आपल्या आगामी सिनेमांच्या प्रकल्पांसह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ते तिथे टाकत असतात. आज खेर यांनी एक मस्त विनोदी व्हीडिओ शेअर केला आहे. यात त्यांच्यासह अभिनेता अनिल कपूरही दिसतो आहे.
अभिनेता अनिल कपूर आणि खेर हे जुने दोस्त. दोघांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. या व्हीडिओत दिसते आहे, की अनिल कपूर आणि खेर दोघे एकत्र सिनेमा पाहण्यासाठी गेले आहेत. एकमेकांविषयी अगदी मिश्कील कमेंट्स करत दोघांनी व्हीडिओ केला आहे.
यात अनिल कपूर म्हणतो, "आज मला इतका आनंद झाला आहे, की जणू मी एखाद्या डेटवर गेलो आहे. मला माझे झेवियर्स कॉलेजचे दिवस आठवत आहेत." यावर खेर हसून दाद देतात. पुढे खेर म्हणतात, "आज आपण आरआरआर सिनेमा पहायला आलो आहोत. मी आणि राजमौली यांच्यात एक साम्य आहे, ते म्हणजे, आम्ही दोघेही 300 कोटी क्लबमधले आहोत. राजमौली तसा माझ्याही पुढे आहे." यावर अनिल कपूर हात जोडत खेर यांना म्हणतो, "मी बिचारा 30 कोटीच्या क्लबमधला आहे. माझ्यावर तुमची कृपा असू द्या. मलाही 300 कोटीच्या क्लबमध्ये येण्यासाठी आशिर्वाद द्या." यावर खेरसुद्धा हसून आशिर्वादासाठी हात उंचावत अनिल कपूरला 'जुग जुग जिओ' म्हणताना दिसत आहेत.
'खूप काळानंतर मी सिनेमा पहायला म्हणून थिएटरमध्ये गेलो. प्रिय मित्र अनिल कपूरसह आरआरआर पाहण्याचा अनुभव काही औरच!' असे सांगत 1 मिनीट 33 सेकंदांच्या या व्हीडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.