BR Chopra House Sold : बॉलिवूडचे ‘महाभारत’ पाहणाऱ्या बंगल्याची विक्री, बी. आर. चोप्रांच्या बंगल्याची किंमत स्वप्नांपेक्षाही मोठी

बी टाऊन
अमोल जोशी
Updated Jun 18, 2022 | 14:57 IST

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांचा जुहूतील बंगला विकला गेला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी के रहेजा कॉर्पला हा बंगला विकला.

BR Chopra House Sold
बी.आर. चोप्रांच्या मुंबईतील 25 हजार स्वेअर फूट बंगल्याची विक्री  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • बी. आर. चोप्रांच्या बंगल्याची विक्री
  • तब्बल 25 हजार स्क्वेअर फुटांचा जुहूतील बंगला
  • के रहेजा कॉर्पने खरेदी केला बंगला

BR Chopra House Sold | प्रसिद्ध चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांचा मुंबईतला बंगला अखेर विकला गेला. मुंबईतील जागांचे दर हे देशात सर्वाधिक आहेत. विशेषतः दक्षिण मुंबईत मोक्याच्या ठिकाणी जागा घेणं, हे तर सर्वसामान्य माणसाचं केवळ स्वप्नच बनून राहिलं आहे. केवळ कोट्यधीश व्यक्ती किंवा संस्थाच अशा ठिकाणी जागा विकत घेण्याचं स्वप्न बघू शकतात. स्वप्नांचे सौदागर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बी. आर. चोप्रा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अलिशान बंगल्याची विक्री करण्याची प्रक्रिया कित्येक वर्ष सुरू होती. अखेर ती पूर्ण झाली असून चोप्रा यांचा बंगला आता अधिकृतरित्या विकला गेला आहे. 

कुणी घेतला चोप्रांचा बंगला?

इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार बी. आर. चोप्रा यांचा बंगला आहे 25,000 स्क्वेअर फुटांचा. हा बंगला खरेदी केला रहेजा कॉर्प या कंपनीने. हा व्यवहार झाला तब्बल 182.76 कोटी रुपयांना. या व्यवहाराच्या रजिस्ट्रेशन आणि स्टँप ड्युटीपायीच 11 कोटी रुपये खर्च झाले. बी. आर. चोप्रा यांची स्नुषा आणि निर्माता रवी चोप्रा यांची पत्नी रेणु चोपडा यांच्याकडून के रहेजा कॉर्पने हा बंगला खरेदी केला. या जागेवर एक निवासी संकुल उभं करण्याचा कंपनीचा प्लॅन असून बंगला पाडून तिथं फ्लॅट सिस्टिम असणारी इमारत उभी केली जाणार आहे. 

बी. आर. चोप्रा आणि मुंबईचं नातं

भारत पाकिस्तान फाळणीनंतर बी. आर. चोप्रा हे पाकिस्तानातून अगोदर दिल्लीत आले आणि तिथून मुंबईत येऊन स्थिरावले. सिने हेराल्ड जर्नलमध्ये त्यांनी चित्रपट समीक्षणं लिहायला सुरुवात केली. 1949 साली त्यांनी पहिला चित्रपट बनवला. त्याचं नाव कारवाह. हा सिनेमा फ्लॉप झाला. त्यानंतर 1951 साली त्यांनी ‘अफसाना’ नावाचा चित्रपट बनवला, जो हिट झाला. 1955 साली त्यांनी स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस उभं केलं. बीआर फिल्म्सच्या बॅनरखाली पहिला चित्रपट झळकला तो ‘नया दौर’. दिलीप कुमार यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट जोरदार हिट झाला आणि नंतर बी. आर. चोप्रांनी मागे वळून पाहिलंच नाही. 

अधिक वाचा - अतुल गोगावलेचं स्वप्न झालं पूर्ण, कारच्या किमंतीची खरेदी केली लक्झरी बाईक

मुंबईत घेतला बंगला

एकामागून एक हिट चित्रपट देऊन बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या यादीत बी. आर. चोप्रांचं नाव घेतलं जाऊ लागलं. याच काळात त्यांनी मुंबईतील जुहू परिसरात एक बंगला घेतला आणि आपल्या आवडीनुसार त्यात बदल करून घेतले. 2008 साली बी. आर. चोप्रा यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी हा बंगला विकण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईतील बॉलिवूडच्या इतिहासात ज्या ज्या गोष्टींची विशेषत्वाने दखल घेतली जाते, त्यात हा बंगलाही होता. मात्र आता हा बंगला जमीनदोस्त होण्याची शक्यता असून एक जुनी आठवण कायमची पुसली जाणार असल्याची रुखरुख त्यांच्या चाहत्यांना लागली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी