सोनू सूद उभारणार देशातील सर्वात मोठी 'ब्लड बँक'

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद देशातील सर्वात मोठी 'ब्लड बँक' उभारणार आहे. यासाठी नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

Bollywood Actor Sonu Sood to launch blood bank app called Sonu For You
सोनू सूद उभारणार देशातील सर्वात मोठी 'ब्लड बँक' 

थोडं पण कामाचं

  • सोनू सूद उभारणार देशातील सर्वात मोठी 'ब्लड बँक'
  • ब्लड बँकेसाठी अभिनेता सोनू सूद एक अॅप लाँच करणार
  • 'सोनू फॉ यू' असे या अॅपचे नाव

मुंबईः बॉलिवूड अभिनेता सोनू सूद देशातील सर्वात मोठी 'ब्लड बँक' उभारणार आहे. यासाठी नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Bollywood Actor Sonu Sood to launch blood bank app called Sonu For You)

अभिनेता सोनू सूद मोठ्या प्रमाणावर समाजकार्य करतो. त्याने कोरोना संकटाच्या काळात अनेक गरीबांच्या जेवणाची व्यवस्था केली. तसेच अनेक परप्रांतीय नागरिकांना मुंबईतून सुरक्षितरित्या घरी जाण्यासाठी व्यवस्था करुन दिली. या व्यवस्थेचा खर्च सोनू सूदने उचलला. स्वतःजवळचे पैसे तसेच इतरांनी समाजकार्याच्या हेतूने दिलेला निधी यांचा व्यवस्थित वापर करुन सोनू सूदने हे काम केले. आता सोनू सूद देशातील सर्वात मोठी 'ब्लड बँक' उभारणार आहे. त्याने ट्वीट करुन ही माहिती दिली.

देशात दररोज १२ हजार नागरिकांचा मृत्यू वेळेवर रक्त मिळाले नाही म्हणून होतो. या नागरिकांचा विचार करुया. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान करुया. देशातील सर्वात मोठी 'ब्लड बँक' उभारुया; अशा स्वरुपाची घोषणा अभिनेता सोनू सूद याने केली. 

'ब्लड बँक' उभारणी मोहिमेचा भाग म्हणून अभिनेता सोनू सूद एक अॅप लाँच करणार आहे. 'सोनू फॉ यू' असे या अॅपचे नाव आहे. या अॅपद्वारे नियमित रक्तदान करणारे नागरिक गरजू व्यक्ती वा त्यांचे नातलग यांच्याशी थेट जोडले जातील. या माध्यमातून कोणाला कोणत्या गटाचे रक्त आवश्यक आहे. रक्त किती मोठ्या प्रमाणावर लागण्याची शक्यता आहे. याचा अंदाज येईल. योग्य व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात राहतील. वेळेवर गरजूंना रक्त मिळेल आणि प्राण वाचवणे शक्य होईल. 

मागणीची नोंद येताच दान करणारे संबंधित हॉस्पिटलमध्ये रक्तदान करतील. यामुळे गरजू व्यक्तीला वेळेत रक्त मिळू शकेल. रक्ताच्या अभावी प्राण जाण्याचा धोका टळेल. अॅपच्या मदतीने दुर्मिळ गटाच्या रक्ताचीही व्यवस्था वेळेवर शक्य होईल, असा विश्वास अभिनेता सोनू सूद याने व्यक्त केला. 

अभिनेता सोनू सूद आणि त्याचा मित्र जॉन्सन संयुक्तपणे अॅप निर्मिती करत आहेत. याआधी कोणाला रक्ताची आवश्यकता असल्याचे कळले तर आम्ही सोशल मीडियावर पोस्ट टाकायचो. पण अॅपमुळे हे काम आणखी प्रभावीरित्या करणे शक्य होईल, हे लक्षात आल्यामुळे आधुनिक पर्याय निवडल्याचे अभिनेता सोनू सूद म्हणाला. अॅपच्या मदतीने गरजू व्यक्तीला वीस मिनिटांच्या आत रक्ताचा पुरवठा होऊ शकेल. दुर्मिळ गटाच्या रक्ताचा वेळेत पुरवठा करणेही शक्य होणार आहे. 

याआधी गरीबांना इ-रिक्षाचे वितरण, गरीब मुलांसाठी विनामूल्य ऑनलाइन शिक्षण अशा समाजोपयोगी योजनाही अभिनेता सोनू सूद याने राबवल्या. कोरोना संकटात हजारो लोकांना केलेल्या मदतीमुळे अभिनेता सोनू सूद याच्या समाजकार्याची महती अनेकांपर्यंत पोहोचली. आता ब्लड बँकेच्या रुपाने सोनू सूद आणखी एक मोठे समाजकार्य सुरू करत आहे. ही मोहीम यशस्वी व्हावी आणि अधिकाधिक लोकांचे प्राण वाचावे, अशी सदिच्छा अभिनेता सोनू सूद याच्या हजारो चाहत्यांनी व्यक्त केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी