Money laundering and Bollywood : नवी दिल्ली: 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर याची चौकशी करत असलेल्या ईडीने बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींशी संबंध असल्याचे म्हटले आहे. सुकेश चंद्रशेखरने केलेल्या वक्तव्यानुसार, ईडीने खुलासा केला आहे की सुकेश 2015 पासून श्रद्धा कपूरला ओळखत होता आणि तिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) प्रकरणात मदत केली होती.
इतर बॉलीवूड सेलिब्रिटींबद्दल बोलताना, चंद्रशेखरने ईडीला सांगितले की तो अभिनेता हरमन बावेजाला देखील ओळखतो आणि पती राज कुंद्राच्या सशर्त सुटकेसाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही त्याच्याशी संपर्क साधल्याचे चंद्रशेखरच्या वक्तव्यात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी ईडीने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची सुकेश चंद्रशेखरसोबतच्या कथित संबंधाबाबत चौकशी केली होती. केंद्रीय एजन्सीने सांगितले की, जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांना आरोपींकडून लक्झरी कारचे टॉप मॉडेल आणि इतर महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत.
दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने अलीकडेच सुकेश चंद्रशेखर, पत्नी लीना मारिया पॉल आणि इतरांविरुद्ध २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दाखल केलेल्या ईडीच्या आरोपपत्राची दखल घेतली आहे. सध्या सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
आर्थिक तपास एजन्सी ईडीने अलीकडेच पीएमएलए अंतर्गत दिल्लीतील तुरुंगातून चालवल्या जात असलेल्या खंडणी रॅकेटमध्ये त्याला अटक केली. ईडीच्या म्हणण्यानुसार, तपासादरम्यान चंद्रशेखर आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित विविध ठिकाणी शोध घेण्यात आला.
चंद्रशेखर आणि लीना मारिया पॉलसह इतर अनेक आरोपींना यापूर्वी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी या प्रकरणात नुकताच मकोकादेखील लावला आहे. त्यामुळे आता 200 कोटी मनी लाँड्रिंगप्रकरणी आणखी कोणाकोणाची नावं समोर येणार आणि हे प्रकरण काय वळण घेणार ते लवकरच कळेल.