कंगना आणि सोनू सूदला दिलासा

अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेता सोनू सूद या या दोघांना मुंबईच्या उच्च न्यायालयाने दिलासा दिला.

kangana_sonu sood
कंगना आणि सोनू सूदला दिलासा 

थोडं पण कामाचं

  • कंगना आणि सोनू सूदला दिलासा
  • कंगना आणि रंगोलीला मुंबईच्या उच्च न्यायालयाने दिला दिलासा
  • सोनू सूदला १३ जानेवारीपर्यंत दिलासा

मुंबईः अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेता सोनू सूद या या दोघांना मुंबईच्या उच्च न्यायालयाने दिलासा दिला. ट्वीट प्रकरणात कंगना आणि तिची बहीण रंगोली या दोघींनी २५ जानेवारी पर्यंत चौकशीसाठी बोलवण्याकरिता अथवा अटक करण्याकरिता मुंबईच्या उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. तसेच सोनू सूद प्रकरणात मुंबईच्या उच्च न्यायालयाने १३ जानेवारीपर्यंत कोणतीही कारवाई करण्यास मनाई केली आहे. (bombay high court prohibits action against kangana, rangoli and sonu sood)

कंगना आणि रंगोलीला मुंबईच्या उच्च न्यायालयाने दिला दिलासा

अभिनेत्री कंगनाने अभिनेता सुशांतच्या मृत्यू प्रकरणात सुरुवातीला मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले. नंतर मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्यावर प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांवर टीका केली. कोरोना प्रश्न हाताळताना हेळसांड झाल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र शासनाच्या कारभाराविषयी प्रश्न उपस्थित केले. आपली भूमिका जाहीरपणे मांडण्यासाठी तिने अनेक ट्वीट केले होते. या घडामोडींनंतर कंगना विरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई केली.

समाजात तेढ निर्माण करणारे ट्वीट केल्याचा, बदनामी केल्याचा आणि देशद्रोहाचा आरोप करत मुंबई पोलिसांनी अभिनेत्री कंगना हिला समन्स बजावले होते. कंगनाच्या भूमिकेला ठाम पाठिंबा देणारे ट्वीट करणारी तिची बहीण रंगोली हिलाही पोलिसांनी समन्स बजावले होते. मात्र कौटुंबिक समारंभाचे कारण देत कंगना आणि रंगोली वारंवार समन्स बजावूनही पोलिसांसमोर हजर झाल्या नव्हत्या. पोलिसांनी दोघींना अटक करण्याची तयारी सुरू केली होती. या विरोधात कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. पोलीस यंत्रणेचा त्रास देण्याच्या उद्देशाने वापर सुरू असल्याचे सांगत कंगनाने तिच्या विरोधात आणि बहीण रंगोली विरोधात सुरू असलेली कारवाई तसेच दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने कंगना आणि रंगोलीला समन्सचा मान राखत स्वतःची बाजू मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात मांडा असे सांगितले. न्यायालयाने कंगना आणि रंगोली यांना अटक करण्यास मनाई करणारा आदेश मुंबई पोलिसांना दिला. यानंतर अभिनेत्री कंगना आणि तिची बहीण रंगोली या दोघींनी ८ जानेवारी रोजी मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात हजर होऊन स्वतःचे म्हणणे मांडले. पोलिसांच्या प्रश्नांना कंगना आणि रंगोलीने उत्तरे दिली तसेच स्वतःची बाजू पोलिसांसमोर मांडली. यानंतर कंगना आणि रंगोली निघून गेल्या. आता मुंबईच्या उच्च न्यायालयाने कंगना आणि रंगोलीला २५ जानेवारी पर्यंत चौकशीसाठी बोलवण्याकरिता अथवा अटक करण्याकरिता मनाई केली आहे.

मुंबई पोलिसांनी समन्स बजावताना गंभीर आरोप केले तरी सुरुवातीला गुन्हा दाखल केला नव्हता. ही बाब लक्षात आल्यावर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात देशद्रोहाचेही एक कलम टाकण्यात आले होते. या प्रकारावरुन मुंबईच्या उच्च न्यायालयाने पोलिसांना जाब विचारला होता. प्रकरण गंभीर होते तर गुन्हा आधी दाखल होणे गरजेचे होते. प्रत्यक्षात समन्सला उत्तर मिळत नाही म्हणून कठोर कारवाईची तयारी सुरू झाल्यावर गुन्हाच दाखल झाला नसल्याचे निदर्शनास आले आणि न्यायदंडाधिकारी अर्थात मॅजिस्ट्रेटने सूचना केली. नंतर गुन्हा दाखल झाला. याच कारणामुळे मुंबईच्या उच्च न्यायालयाने कंगना आणि रंगोली पोलीस चौकशीला सहकार्य करत असल्याचा मुद्दा विचारात घेतला. यानंतर उच्च न्यायालयाने कंगना आणि रंगोलीला २५ जानेवारी पर्यंत चौकशीसाठी बोलवण्याकरिता अथवा अटक करण्याकरिता मनाई केली.

सोनू सूदला १३ जानेवारीपर्यंत दिलासा

मुंबई मनपाने सोनू सूद याच्यावर जुहू परिसरातील एबी नायर रोडवरील शक्ती सागर या सहा मजली वासी इमारतीचे बेकायदा पद्धतीने हॉटेलमध्ये रुपांतर केल्याचा ठपका ठेवला आहे. या प्रकरणात मुंबई मनपाने जुहू पोलिसांना महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यास सांगितले. या प्रकरणात सोनू सूदने मुंबईच्या उच्च न्यायालयात दाद मागितली. 

सर्व नियमांचे पालन करुन आणि परवानगी घेऊन हॉटेल उभे केले आहे. फक्त महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अॅथॉरिटीची (MCZMA) परवानगी प्रलंबित असताना हॉटेल सुरू केले आहे, असे सोनू सूदचे म्हणणे आहे. तर सोनू सूदने नियमांचे पालन केलेले नाही आणि विना परवानगी हॉटेल उभे केल्याचा आरोप मुंबई मनपाने केला आहे. या प्रकरणात मुंबईच्या उच्च न्यायालयाने १३ जानेवारीपर्यंत कोणतीही कारवाई करण्यास मनाई केली आहे. 

याआधी सोनू सूद लॉकडाऊन काळात केलेल्या समाजकार्यामुळे चर्चेत आला होता. शिवसेनेने सोनू सूदला भाजपचा पाठिंबा असल्याचा आरोप केला होता. सोनू सूदने मात्र स्वतःच्या पैशांनी तसेच ओळखीतल्या व्यक्ती आणि चाहत्यांनी दिलेल्या पैशांच्या जोरावर समाजकार्य सुरू असल्याचे सांगितले होते. कोणत्याही राजकीय पक्षासोबत समाजकार्यासाठी जवळीक साधलेली नाही, असेही सोनू सूदने सांगितले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी