सुशांत प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआय मुंबईत

cbi in mumbai for investigating sushant case अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी सीबीआयचे पथक दिल्लीहून विमानाने मुंबईत दाखल झाले.

cbi in mumbai for investigating sushant case
सुशांत प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआय मुंबईत 

थोडं पण कामाचं

  • सुशांत प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआय मुंबईत
  • सीबीआयची कारवाई सुरू
  • सीबीआयसमोर पुरावे शोधण्याचे आव्हान

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Actor Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी सीबीआयचे (Central Bureau of Investigation - CBI) पथक दिल्लीहून विमानाने मुंबईत दाखल झाले. हे पथक सुशांतचा मृत्यू तसेच त्याच्याशी संलग्न असलेल्या आणि सुशांतच्या मृत्यूशी संलग्न असू शकतील अशा सर्व प्रकरणांचा तपास करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) तपासाचे अधिकार सीबीआयला दिले आहेत. (cbi in mumbai for investigating sushant case)

सुशांतचे वडील के के सिंह (K K Singh) यांनी बिहार (Bihar) पोलिसांकडे सुशांतच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी एफआयआर (FIR - First Information Report) रजिस्टर केली. या एफआयआरआधारे प्राथमिक तपास केल्यानंतर बिहार पोलिसांनी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला विरोध दर्शवत रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. याआधी काही दिवसांपूर्वी स्वतः रियाने मुंबई पोलिसांऐवजी (Mumbai Police) सीबीआयने तपास करावा अशी मागणी केली होती. मात्र बिहार पोलीस सक्रीय झाल्यानंतर सीबीआय नको, बिहारची तक्रार मुंबई पोलिसांकडे हस्तांतरित करा; अशा स्वरुपाची मागणी रियाने केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकारची कृती वैध ठरवत सीबीआयला तपासाचा आदेश दिला.

सुशांतचा मृत्यू १४ जून रोजी झाला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी डेथ रिपोर्ट (Death Report) नोंदवला पण एफआयआर करुन घेणे टाळले. अद्याप मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे बिहारमधील एफआयआर ही सुशांत प्रकरणातील झिरो एफआयआर असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयच्या हाती तपास सोपवण्याचा बिहारचा निर्णय वैध ठरवला.

सीबीआयची कारवाई सुरू

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाआधारे सीबीआयने बिहार पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्याकडे असलेली सुशांत प्रकरणाची माहिती घेतली. सीबीआयचे पथक आता मुंबई पोलिसांकडून सुशांत प्रकरणातील त्यांच्या कारवाईची सविस्तर माहिती घेईल. यानंतर सीबीआयच्या तपासाला सुरुवात होणार आहे. 

सीबीआयला क्वारंटाइनच्या नियमांतून सवलत

सीबीआयची टीम गुन्ह्याच्या तपासासाठी आली असल्यामुळे त्यांना क्वारंटाइनच्या नियमातून सवलत मिळाली आहे. मुंबईत दाखल झाल्यापासून सीबीआयने काम सुरू केले आहे. सीबीआयच्या दिल्लीहून आलेल्या टीममध्ये महिला आणि पुरुष सदस्य आहेत. सुशांत प्रकरणात महिलांची चौकशी करायची असल्यामुळे सीबीआयने खबरदारी घेतली आहे.

सीबीआयसमोर पुरावे शोधण्याचे आव्हान

सुशांतचा मृत्यू १४ जून रोजी झाला होता. त्याने गळफास लावून घेतला, अशा स्वरुपाचा डेथ रिपोर्ट मुंबई पोलिसांनी तयार केला आणि एफआयआर न नोंदवता ५६ जणांची साक्ष घेतली होती. मात्र सुशांत प्रकरणी सीबीआयला तपासाचे आदेश देण्यात आल्यामुळे सीबीआयचे पथक नव्याने तपास आणि चौकशी करणार आहे. सीबीआय कशा प्रकारे कारवाई करते याकडे अनेकांचे लक्ष आहे. घटनेला दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाल्यामुळे ठोस पुराव्यांचे संकलन करुन तपास करणे हे सीबीआयच्या पथकापुढचे सर्वात मोठे आव्हान आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी