Sanjay Dutt's Panipat Look: संजय दत्त पुन्हा एकदा ‘खलनायक’, ऐतिहासिक पानिपत सिनेमातला फर्स्ट लूक रिव्हील

बी टाऊन
Updated Nov 04, 2019 | 16:37 IST | चित्राली चोगले

पानिपत हा ऐतिहासिक सिनेमा जाहीर झाल्यापासून प्रचंड चर्चेत आहे. नुकतंच सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज केलं गेलं आणि आता सिनेमातील मुख्य खलनायक असलेल्या संजय दत्तचा लूक रिव्हील केला गेला आहे. पाहा हा लूक.

check out the intriguing poster of sanjay dutt as ahmed shah abdali from the historic film panipat
Sanjay Dutt's Panipat Look: संजय दत्त पुन्हा एकदा ‘खलनायक’, ऐतिहासिक पानिपत सिनेमातला फर्स्ट लूक रिव्हील  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित पानिपत सिनेमात संजय दत्त 'खलनायक'
  • संजय दत्तच्या अहमद शाह अब्दालीचं फर्स्ट लूक पोस्टर भेटीला
  • पानिपत सिनेमाचा बहुप्रतिक्षीत ट्रेलर उद्या होणार रिलीज

मुंबई: दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि ऐतिहासिक सिनेमांचं एक वेगळंच नातं आहे. आशुतोष गोवारीकरचं नाव एखाद्या ऐतिहासिक सिनेमाशी जोडलं गेलं की या सिनेमावर हिट शिक्कामोर्तब होणार हे आता एक गणित बनलं आहे. लार्जर दॅन लाईफ ऐतिहासिक सिनेमे करण्यात आशुतोष यांचा हातखंडा आहे. पुन्हा एकदा आशुतोष यांनी असाच एक शिवधनुष्य पेलायचं ठरवलं आणि त्यांनी पानिपत हा सिनेमा जाहीर केला. जाहीर झाल्यापासूनच या सिनेमाबद्दल एक जोरदार चर्चा रंगली होती. नुकतंच या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज केलं गेलं आणि सिनेमाची उत्सुकता निश्चितच वाढली. ही उत्सुकता अधिक ताणून धरण्यासाठी सिनेमाचा ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे असं सुद्धा जाहीर झालं. आता ट्रेलरच्या आधी सिनेमाच्या मेकर्सनी प्रेक्षकांना एक अनोखी भेट दिली आहे.

प्रेक्षकांची ताणलेली उत्सुकता शिगेला पोहोचवण्यासाठी सिनेमातल्या एका अत्यंत महत्वाच्या पात्राचा लूक रिव्हील करण्यात आला आहे. अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर खलनायक म्हणून दिसणार आहे. पानिपत या सिनेमामध्ये संजय मुख्य खलनायकाची भूमिका साकारत असून त्याचं सिनेमाचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. सिनेमात संजय अहमद शाह अब्दाली या पानिपतातील लढाईतला असलेला मुख्य खलनायक साकारणार आहे. याच कॅरेक्टरचा त्याचा लूक सध्या रिलीज झाला असून त्याला खूप चांगला प्रतिसाद सोशल मीडियावर मिळताना दिसतोय.

खुद्द संजयनी त्याचा हा लूक त्याच्या सोशल मीडियावरून शेअर केला असून त्यांनी त्यासोबत लिहिलं आहे, ‘अहमद शहा अब्दाली याची सावली जिथे पडते तिथे मृत्यूशी भेट होते. पानिपतचा ट्रेलर उद्या भेटीला.’ त्याचसोबत त्याने सिनेमातील त्याच्या सहकलाकारांना यात टॅग केलं आहे. संजय दत्तचा हा खलनायकी लूक निश्चितंच खूप उत्सुकता वाढवणारा आहे. संजयसोबत त्याच्या सहकलाकार अर्जुन कपूर आणि कृती सनॉनने सुद्धा संजयचं हे फर्स्ट लूक पोस्टर त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं आहे.

पानिपतातील तिसरे महायुद्ध हे इतिहासातील एक खूप मोठं युद्ध म्हणून कायम लक्षात राहिलं आहे. याच पानिपतातील तिसऱ्या महायुद्धावर पानिपत हा ऐतिहासिक सिनेमा बेतलेला आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या सिनेमाचं संगीत मराठमोळी संगीतकार भावंडांची जोडी अजय-अतुल यांचं आहे. सिनेमात सदाशिवराव भाऊ यांच्या भूमिकेत अर्जुन कपूर दिसणार आहे तर पार्वतीबाई म्हणून कृती सेनॉन झळकणार आहे. अर्जुन आणि कृतीच्या फर्स्ट लूक पोस्टरची आता उत्सुकता लागलेली आहे तसंच सिनेमाच्या ट्रेलरची वाट प्रेक्षक चातकासारखी पाहत आहेत. सिनेमाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर उद्या म्हणजे मंगळवारी भेटीला येणार आहे. सिनेमात संजय अर्जुन आणि कृतीसोबत पद्मिनी, झिनत, मोहनिष बेहल, मिर सरवार, नवाब शहा आणि कुणाल कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित पानिपत सिनेमा येत्या ६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी