कोरोनाची लढाई हारले दोन दिग्गज : प्रसिद्ध सितारवादक देबू चौधरी आणि अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचे निधन

बी टाऊन
Updated May 01, 2021 | 17:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

प्रसिद्ध सितारवादक आणि पद्मभूषण पंडित देवव्रत चौधरी उर्फ देबू चौधरी यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. तर अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचेदेखील कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ५२ वर्षांचे होते.

Debu Chaudhary & actor Bikramjeet Kawarpal died due to covid-19
देबू चौधरी आणि अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन 

थोडं पण कामाचं

  • दोन दिग्गज पडद्याआड
  • देबू चौधरी आणि अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचे निधन
  • कोरोनामुळे झाले निधन

नवी दिल्ली : प्रसिद्ध सितारवादक आणि पद्मभूषण पंडित देवव्रत चौधरी उर्फ देबू चौधरी यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. देबू चौधरी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर बुधवारी रात्री दिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे त्यांना पोलिसांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तर अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचेदेखील कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ५२ वर्षांचे होते.

देबू चौधरी यांच्या मुलाने दिली माहिती


देबू चौधरी यांचा मुलगा प्रतिक चौधरी याने सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची बातमी दिली. शुक्रवारी रात्री देबू चौधरी यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. भारत सरकारने १९९२ मध्ये कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी सेनिआ संगीत घराण्याचे पंचू गोपाल दत्त आणि संगीत आचार्य उस्ताद मुश्ताक अली खान यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले होते.

अशोक पंडित यांची श्रद्धांजली


अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनावर फिल्म निर्माता अशोक पंडित यांनी शोक व्यक्त केला आहे. अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. आज कोरोनामुळे अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचे निधन झालेले ऐकून दु:ख झाले. ते एक निवृत्त लष्करी अधिकारी होते. त्यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते.

या चित्रपटात केल्या होत्या बिक्रमजीत यांनी भूमिका


भारतीय सेनेतून निवृत्त झाल्यानंतर २००३ मध्ये बिक्रमजीत कंवरपाल यांनी अभिनयाची सुरूवात केली होती. त्यांनी पेज-३, रॉकेट सिंह: सेल्समन ऑफ द ईयर, आरक्षण, मर्डर-२, टू स्टेट्स आणि द गाझी अटॅक यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.

काल ३५०० जणांचा मृत्यू


शुक्रवारी देशात कोरोना संक्रमितांची विक्रमी नोंद करण्यात आली. शुक्रवारी ४ लाख १ हजार ९११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. ही जगातील कोणत्याही देशात एकाच दिवशी झालेल्या कोरोना संक्रमितांची सर्वात मोठी संख्या आहे. जगात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूदेखील भारतातच होत आहेत. काल भारतात ३,५२१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जगात मागील २४ तासात झालेल्या मृत्यूंमधील दर चौथा मृत्यू भारतातील होता.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभर थैमान घातले असून दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोना बाधितांच्या संख्येबरोबरच कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्यादेखील वाढत चालली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात अनेक प्रसिद्ध व्यक्ती, दिग्गज, नामांकित व्यक्ती यांचाही समावेश आहे. कोरोनामुळे देशातील उद्योगधंद्यांवर विपरित परिणाम झाला असून कोरोनामुळे अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. मागील वर्षीदेखील कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर देशातील लाखो लोकांना आपला रोजगार गमवावा लागला होता. यावर्षीदेखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी