Kanika Kapoor Corona: गायिका कनिका कपूर पाचव्यांदा पण कोरोना पॉझिटिव्ह, डॉक्टरांची काळजी वाढली

बी टाऊन
Updated Mar 31, 2020 | 15:56 IST | टाइम्स नाऊ हिंदी

प्रसिद्ध बॉलिवूड गायिका कनिका कपूर पाचव्यांदा सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. मंगळवारी डॉक्टरांनी तिची पाचव्यांदा कोरोनाची टेस्ट केली होती.

Kanika Kapoor
बेबी डॉल फेम कनिका कपूर पाचव्यांदा कोरोना पॉझिटिव्ह 

थोडं पण कामाचं

  • कनिका कपूरची कोरोना टेस्ट पाचव्यांदाही पॉझिटिव्ह
  • कनिकाची तब्येत स्थिर असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं
  • दर ४८ तासांनंतर केली जातेय कनिकाची कोरोना टेस्ट

kanika kapoor tested positive for novel coronavirus: ‘चिट्टियां कलाईया रे’ सारखे अनेक प्रसिद्ध गाणी गायलेली प्रसिद्ध बॉलिवूड गायिका कनिका कपूरची कोरोना टेस्ट पाचव्यांदा पुन्हा पॉझिटिव्ह आलीय. २० मार्चला पहिल्यांदा कनिका कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं होतं आणि तेव्हापासून डॉक्टरांनी पाच वेळा तिची तपासणी केलीय. त्यात ती पाचही वेळा कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. आज केलेल्या टेस्टमध्ये सुद्धा कनिका कपूर पॉझिटिव्ह आढळली आहे.

कोरोना टेस्ट करण्यासाठी प्रत्येक ४८ तासांनंतर कनिकाचं सँपल घेतलं जात आहे. कनिका कपूरच्या टेस्ट सतत पॉझिटिव्ह येत असल्यामुळे डॉक्टरांची काळजी वाढली आहे. कनिका कपूर सध्या लखनऊच्या एसजीपीजीआयएमएस (SGPGIMS) या हॉस्टिटलमध्ये भरती आहे आणि तिची तब्येत स्थिर असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. कनिकाच्या तब्येतीबाबत हॉस्पिटलचे डायरेक्टर आर. के. डिमन यांनी मुंबई मिररला सांगितलं की, कनिकाची प्रकृती पहिले पेक्षा चांगली आहे आणि आता ती वेळेवर जेवण करतेय. काळजीचं कुठलंही कारण नाही.

लखनऊमध्ये पोहोचल्यावर केली होती पार्टी

कनिका कपूरनं कोरोना पॉझिटिव्ह असतांनाही लखनऊ आणि कानपूरमध्ये अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती आणि २०० हून अधिक लोकांच्या ती संपर्कात आली होती. त्यामुळे अनेक लोकांना तिनं संकटात टाकलं होतं. कनिकाची पहिली टेस्ट पॉझिटिव्ह येताच तिनं इंस्टाग्रामवर स्वत: ही माहिती दिली होती. त्यानंतर तिच्यावर बॉलिवूडमधूनही खूप टीका झाली. एक जबाबदार सेलिब्रिटी असून तिचं हे बेजबाबदार पणाचं वागणं अनेकांच्या जीवावर बेतू शकतं, अशी टीका सोशल मीडियावर केली केली. त्यानंतर उत्तरप्रदेश पोलिसांनी कनिका कपूर विरोधात एफआयआर सुद्धा दाखल केली होती.

लंडनहून परतली होती कनिका

कनिका कपूरनं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कोरोना झाल्याचं सांगितलं होतं. तिनं इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहून सांगितलं होतं की, मला मागील चार दिवसांपासून फ्लू आहे आणि माझी कोविड-१९ टेस्ट पॉझिटिव्ह आलीय. माझ्या कुटुंबियांना आता क्वारंटीन करण्यात आलंय. कनिकानं पोस्टमध्ये लिहिलं की, तीन दिवसांपासून तिला ताप आहे आणि आता ती हॉस्पिटलमध्ये आहे. लंडनहून परतल्यानंतर तिची संपूर्ण तपासणी झाली होती, असं कनिका म्हणते.

पण काही मीडिया रिपोर्ट्सनुसार कनिका कपूरनं एअरपोर्ट स्टाफसोबत संगनमत करून तिथून पळ काढला होता आणि एअरपोर्टवर कोरोनाची टेस्ट केली नव्हती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी