मनोरंजनसृष्टीत ३० टक्के कॉस्ट कटिंग

बी टाऊन
Updated May 31, 2020 | 14:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

मनोरंजनसृष्टीत कलाकारांचे मानधन आणि सेटवरील इतर कर्मचाऱ्यांचा पगार यात सरसकट ३० टक्के कपात (कॉस्ट कटिंग) करण्याची तयारी सुरू झाली आहे.

shooting
मनोरंजनसृष्टीच्या खर्चात कपात 

थोडं पण कामाचं

  • भारतीय मनोरंजनसृष्टीत ३० टक्के कॉस्ट कटिंग
  • देशातील सर्व प्रॉडक्शन हाऊसच्या खर्चात कपात
  • मनोरंजनसृष्टीवर बेकारीचे संकट

मुंबईः कोरोना संकटामुळे मनोरंजनसृष्टीला मोठा फटका बसला आहे. यात सोशल डिस्टंस आणि इतर आरोग्यविषयक नियमांमुळे रोजच्या शूटिंगच्या खर्चात वाढ होणार आहे. खर्चाचा हा भार सांभाळण्यासाठी मनोरंजनसृष्टीत कलाकारांचे मानधन आणि सेटवरील इतर कर्मचाऱ्यांचा पगार यात सरसकट ३० टक्के कपात (कॉस्ट कटिंग) करण्याची तयारी सुरू झाली आहे. या निर्णयाचा परिणाम मुंबईसह देशभरातील मनोरंजनसृष्टीशी संबंधित लोकांना जाणवणार आहे. 

शूटिंग ठप्प, मनोरंजनसृष्टीचा कारभार बंद

देशात २२ मार्चला जनता कर्फ्यू आणि २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे मार्चच्या शेवटच्या टप्प्यात शूटिंग विस्कळीत झाले. नंतर अद्याप शूटिंग सुरू झालेले नाही. काही ठिकाणी किरकोळ स्वरुपाचे शूटिंग छोट्या टीमच्या मदतीने अथवा मोबाईल कॅमेऱ्याच्या मदतीने करण्यात आले. पण मनोरंजनसृष्टीत टीव्ही मालिका, वेबसिरिज आणि सिनेमासाठी मोठ्या प्रमाणावर होणारे शूटिंग अद्याप सुरू झालेले नाही.

देशातील सर्व प्रॉडक्शन हाऊसच्या खर्चात कपात

शूटिंग बंद असल्यामुळे सेटवर दररोज काम करणारे हातावर पोट असलेले अनेक गरीब मजूर आर्थिक अडचणीत आहेत. सरकारी यंत्रणा, निर्माते, कलाकार, स्थानिक नेते यांच्याकडून मिळणाऱ्या मदतीवरच ते अवलंबून आहेत. शूटिंग लवकर सुरू होणे त्यांच्यासाठी सर्वाधिक आवश्यक आहे. पण सरकारने शूटिंग सुरू करण्यासाठी सोशल डिस्टंस आणि नियमित आरोग्य तपासणीचे बंधन घातले आहे. सेटवर ही व्यवस्था करण्यासाठी होणारा खर्च आणि पुढील काही महिन्यांमध्ये मिळणारे उत्पन्न यांचा विचार करुन देशातील सर्व प्रॉडक्शन हाऊसने खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 

थिएटर, मल्टिप्लेक्स बंदच

थिएटर सुरू करण्याबाबत सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. टीव्ही मालिका आणि वेब सिरिजसाठी जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नातही आधीच्या तुलनेत आता घट होण्याची चिन्ह आहेत. मंदीतून सावरायला सगळ्यांनाच वेळ लागेल त्यामुळे थिएटर सुरू झाली तरी तिकीट काढून कितीजण येणार?, हा एक अनुत्तरीत प्रश्न आहे. अशा परिस्थितीत निर्मिती खर्च नियंत्रित करणे आवश्यक आहे, असे मत अनेक निर्माते व्यक्त करत आहेत. 

मनोरंजनसृष्टीवर बेकारीचे संकट

प्रॉडक्शन हाऊस, थिएटर, मल्टिप्लेक्स, टीव्ही वाहिन्या, ओटीटी प्लॅटफॉर्म या ठिकाणी काम करणाऱ्यांपैकी काही जणांना खर्च कपातीमुळे नोकरी गमवावी लागण्याची शक्यता आहे. काही टीव्ही वाहिन्यांनी तर ज्यांचा टीआरपी लॉकडाऊन सुरू होण्याआधी घसरत होता अशा मालिका कायमच्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत. काही मालिकांसाठी मोठा खर्च करुनही अपेक्षित टीआरपी मिळत नव्हता. अशा मालिकाही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रिअॅलिटी शो संकटात

मोठ्या कलाकारांच्या मानधनात मोठी कपात होण्याची शक्यता आहे. ही कपात झाल्यास कोट्यवधी रुपयांचे मानधन घेणाऱ्या कलाकरांना फटका बसणार आहे. काही कार्यक्रमांमधून पैसे वाचवण्यासाठी मोठ्या कलाकारांच्या समावेशाचे प्रमाण कमी केले जाण्याची शक्यता आहे.  अनेक रिअॅलिटी शो बंद होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी