Bhanu Athaiya: देशाला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानू अथय्या यांचे निधन

India's first Oscar winner Bhanu Athaiya dies: भारताला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ वेशभूषाकार भानू अथय्या यांचे निधन झाले आहे. त्या ९१ वर्षांच्या होत्या. 

Bhanu_Athaiya
भानू अथय्या   |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई : प्रसिद्ध वेशभूषाकार (Costume designer) भानू अथय्या (Bhanu Athaiya) यांचे निधन झाले आहे. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. भानू अथय्या यांचं निधन झाल्याचं न्यूज एजन्सी पीटीआयने आपल्या ट्वीटरवरुन दिली आहे. भानू अथय्या या ९१ वर्षांच्या होत्या. भानू अथय्या यांनी भारताला जगप्रसिद्ध आणि मानाचा ऑस्कर पुरस्कार मिळवून दिला (Indias first Oscar winner) होता. ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या.

भानू अथय्या या मुळच्या कोल्हापूर येथील होत्या. त्यांनी १९५६ साली सुपरहिट सिनेमा सीआयडी साठी त्यांनी वेशभूषाकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. रिचर्ड एटनबरो यांच्या १९८२ मध्ये आलेल्या 'गांधी' सिनेमासाठी भानू अथय्या यांचा सर्वोच्च पुरस्कार ऑस्करने सन्मानित करण्यात आले. भानू अथय्या यांनी आमिर खानच्या 'लगान' आणि श्रीदेवीच्या 'चांदणी' सिनेमातही वेशभूषाकार म्हणून आपली प्रतिभा दाखवली होती. 

भानू अथय्या यांचे पूर्ण नाव भानुमती अण्णासाहेब राजोपाध्याय होते. त्यांचा जन्म २८ एप्रिल १९२९ रोजी कोल्हापुरात झाला होता. त्यांनी जवळपास १०० सिनेमांमध्ये वेशभूषाकार म्हणून काम केले आहे. त्यांनी अनेक दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. ज्यामध्ये गुरुदत्त, यश चोपडा, बी. आर. चोपडा, राज कपूर, विजय आनंद, राज खोसला, आशुतोष गोवारिकर, कोनार्ड रूक्स आणि रिचर्ड एटनबरो यांच्या सारख्या नावांचा समावेश आहे. अभिनेता शाहरूख खान याचा 'स्वदेस' हा सिनेमा भानू अथय्या यांचा शेवटचा सिनेमा होता ज्यात त्यांनी वेशभूषा डिझाइन केल्या होत्या.

भानू अथय्या यांनी अनेक सिनेमांत आपले योगदान दिले आहे. गुलजार यांच्या 'लेकीन' (१९९०) आणि आशुतोष गोवारिकर यांच्या 'लगान' (२००१) या सिनेमांसाठी भानू अथय्या यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली

भानू अथय्या यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, "आपल्या कर्तृत्वाने भारतीय कला क्षेत्राचा झेंडा जगाच्या पटलावर रोवणाऱ्या कलाकार म्हणून वेशभूषाकार भानू अथय्या सदैव स्मरणात राहतील. जमिनीवर पाय असलेली पण तितक्याच उत्तूंग सर्जनशीलतेची महान कलाकार आपल्यातून निघून गेली आहे. त्यांचा भारतीय संस्कृती आणि परंपरांचा कलाविष्करांच्या अंगाने गाढा अब्यास होता, अशई श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट सृष्टीतील जागतिक स्तरावरील मानांकित ऑस्कर पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय कलाकार ज्येष्ठ वेशभूषाकार भानू अथय्या यांना अर्पण केली आहे."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी