मुंबई: दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्यानंतर या दोघांच्या वैयक्तिक फॅन फॉलोविंग इतकीच या कपलची फॅन फॉलोविंग प्रचंड वाढली. त्यानंतर गेल्या वर्षी झालेलं त्यांचं लग्न आणि त्यानंतरचं त्यांचं आयुष्य याकडे सगळ्या जगाचं लक्ष असतं. त्यांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्री इतकीच लोकप्रिय आहे ती त्यांची ऑफस्क्रिन केमिस्ट्री. रिल आणि रिअल लाईफमध्ये लोकप्रिय असलेलं हे कपल कायम आपल्या सिनेमांनी आणि त्यांच्या सोशल मीडियावरील एकमेकांसाठी केलेल्या पोस्ट-कमेन्ट्समुळे चर्चेत असतं. पण या बॉलिवूडच्या ए-लिस्ट कपलमधल्या दीपिकाला जर त्यांच्या या लग्नाचाच विसर पडला तर? काय होईल असा विचार करत आहात, मग वाचा नेमकं काय झाल आहे ते.
होय अगदी बरोबर वाचलंत तुम्ही. दीपिकाला रणवीरसोबत झालेल्या तिच्या लग्नाचा विसर पडलाय. झालं असं की दीपिका तिच्या ‘लिव्ह लव लाफ फाऊंडेशन’च्या एका इव्हेन्टसाठी नुकतीच हजर होती. त्या दरम्यान दीपिका तिच्या खऱ्या आयुष्यात ती निभावत असलेल्या सगळ्या भूमिकांबद्दल बोलत होती. तेव्हा ती ओघाने म्हणाली, “मी एक मुलगी आहे, एक बहिण आहे, मी एक अभिनेत्री आहे…” यावर तिला तिच्या लग्नाची आठवण करुन देत तिथे हजर असलेली मॉडरेटर म्हणाली, “आणि एक पत्नी...” त्यावर दीपिकाने तडक एक धमाल उत्तर दिलं, “अरे देवा! मी विसरलेच...” यावर ऑडियन्स खूप हसू लागलं. दीपिकाचा हा धमाल व्हिडिओ पाहा.
दीपिकाच्या या विनोदी क्षणाचा व्हिडिओ लगेचच इंटरनेटवर व्हायरल होऊ लागला. त्यावर अनेकांनी जोक्स सुद्धा बनवले आहेत आणि ते सुद्धा सध्या सगळीकडे पसरत आहेत. यावर दीपिकाचा डार्लिंग पती रणवीरची अजून तरी काही प्रतिक्रिया आलेली नाहीय. पण यावर तो काहीतरी त्याच्या स्टाईलमध्ये प्रतिक्रिया देईल असा अंदाज वर्तवत याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. हे दोघं कायम एकमेकांच्या पोस्टवर एकमेकांची खेचण्यासाठी कमेन्ट करत असतात. दीपिकाने तर नुकताच एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये एक कपल होतं आणि मुलीला खायला जमलं नाही तर ती कशी तिच्या पार्टनरला सगळं देऊन टाकते हे दाखवलं होतं. हा विनोदी फोटो दीपिकाने शेअर करत त्यात रणवीरला टॅग केलं होतं आणि त्याला ‘अस’ (US) असं कॅप्शन पण दिलं होतं. त्यावर रणवीरने एक गोड कमेन्ट पण केला आहे. तसंच तिने अजून एक असाच गोंडस विनोदी फोटो शेअर केला आहे आणि त्यात पण तिने रणवीरला टॅग केलं आहे.
रिअल लाईफमध्ये इतकी धमाल केमिस्ट्री असलेल्या या कपलला आता लवकरच रिल लाईफमध्ये एकत्र पाहता येणार आहे. लवकरच हे दोघं कपिल देव यांच्या बायोपिकमध्ये एकत्र दिसणार आहेत. जिथे सिनेमात रणवीर कपिल यांची भूमिका साकारताना दिसेल तिथे दीपिका कपिल यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचं शूट नुकतंच आटोपलं असून लवकरच हा सिनेमा भेटीला येणार आहे. या व्यतिरिक्त हे पॉवर कपल त्यांच्या वैयक्तिक प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा फार बिझी आहे.