Chhapaak Weekend Collection: पहिल्या विकेंडला दीपिका पदुकोणच्या छपाकने कमावले इतके कोटी

बी टाऊन
Updated Jan 13, 2020 | 14:30 IST | चित्राली चोगले

Chhapaak Weekend Collection:अॅसिड अटॅक सरवायवर लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारित छपाक सिनेमा नुकताच भेटीला आला. सिनेमात दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असून सिनेमाची बॉक्स ऑफिस कमाई कशी आहे यावर एक नजर टाकूया.

deepika padukone starrer chhapaak is going slow at the box office check the film's first weekend collection vikrant massey meghna gulzar
Chhapaak Weekend Collection: पहिल्या विकेंडला दीपिका पदुकोणच्या छपाकने कमावले इतके कोटी 

थोडं पण कामाचं

  • दीपिका पदुकोणच्या छपाकचा बॉक्स ऑफिसवर पहिला आठवडा
  • पहिल्या विकेंडला सिनेमाचं कलेक्शन १७.६० कोटींवर
  • सिनेमा बॉक्स ऑफिस रेसमध्ये पडतोय फिका?

मुंबई: बॉलिवूडमध्ये नुकताच या वर्षातला पहिला आणि मोठा बॉक्स ऑफिस क्लॅश पाहायला मिळाला. दोन मोठे सिनेमे तान्हाजी द अनसंग वॉरियर आणि छपाक एकमेकांसमोर उभे ठाकले. दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेला आणि निर्माती म्हणून ती पदार्पण करत असलेला छपाक सिनेमाकडे विशेष लक्ष होतं ते अनेक कारणांसाठी. हा सिनेमा अगदी पहिल्या दिवसापासून चांगल्या आणि वाईट गोष्टींसाठी चर्चेत राहिला आहे. अखेर सिनेमा भेटीला आला आणि बॉक्स ऑफिसवर सिनेमाने आपली जादू दाखवायला सुरूवात तर केली पण ही जादू कितपत यशस्वी ठरत आहे चला पाहूया.

छपाक सिनेमाला पहिल्या दिवशी चांगली सुरूवात मिळाली आणि सिनेमाला ४.७७ कोटींचं ओपनिंग मिळालं. ओपनिंग ठीक-ठाक असल्याचा दावा अनेक फिल्म एनलिस्टने केला आहे. पुढे सिनेमाने अधिक उत्तम कामगिरी करण्याची गरज आहे असं सुद्धा बोललं जाऊ लागलं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सिनेमाच्या कमाई मध्ये ३५-४० टक्क्यांनी वाढ होताना दिसली. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने ६.९० कोटींचा आकडा गाठला. त्यानंतर लक्ष लागलं होतं की सिनेमा तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी किती मजल मारतोय याकडे. अखेर सकारात्मक माऊथ पब्लिसिटीची सिनेमाला मदत झाली आणि तिसऱ्या दिवशी सिनेमाला ७.२० कोटींचा आकडा गाठण्यात यश मिळालं.

 

त्यामुळे पहिल्या विकेंडच्या हिशोबाने पाहायला गेलं तर छपाक सिनेमाची पहिल्या विकेंडची पूर्ण कमाई १७.६० कोटी इतकी झाली आहे. ही कमाई चांगली असली तरी सिनेमासाठी हा मॅजिक फिगर नाहीये हे निश्चित. या सिनेमाच्या तुलनेत मात्र तानाजी उत्तम कमाई करताना दिसत आहे. त्यामुळेच हा आठवडा छपाक या सिनेमासाठी फारच महत्त्वाचा ठरणार आहे. या आठवड्यात संपूर्ण चित्र स्पष्ट होईल की सिनेमाची बॉक्स ऑफिस सफर कशी ठरत आहे ते.  छपाक सिनेमाने पहिल्याच विकेंडला १७.६० कोटींचा आकडा तर गाठला पण हा आकडा अपेक्षेपेक्षा फारच कमी असल्याचे सुद्धा बोललं जात आहे.

 

 

त्यामुळे येणारा आठवडा या सिनेमासाठी काय कमाल करतो आणि बॉक्स ऑफिसवर सिनेमाची कमाई कोणता आकडा गाठत आहे याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. असं असलं तरीही सिनेमातील दीपिकाच्या कामाची खूपच प्रशंसा होताना दिसत आहे तसंच तिच्या अपोझिट झळकणारा विक्रांत मॅसीचं काम सुद्धा उत्तम झाल्याचं बोललं जात आहे. सिनेमाची सध्या पॉझिटिव्ह माऊथ पब्लिसिटी होत असल्याकारणाने या आठवड्यात कमाई मध्ये वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी