Dhanush and Aishwarya Divorce update : नवी दिल्ली : सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या नुकतीच पती धनुषपासून विभक्त झाली आहे. दोघांचेही मार्ग वेगळे झाले आहेत. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या आणि धनुषने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना याची माहिती दिली होती. आता या प्रकरणावर धनुषचे वडील कस्तुरी राजा यांनी मौन सोडलं आहे. या दोघांचा घटस्फोट म्हणजे केवळ कौटुंबिक कलह असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
धनुषचे (Dhanush) वडील कस्तुरी राजा यांनी एका वृत्तपत्राशी संवाद साधताना सांगितले की, “धनुष आणि ऐश्वर्यामध्ये भांडण सुरु आहे, प्रत्येक पती-पत्नीमध्ये भांडणं होतात,
परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांचे नाते संपले आहे. हा कौटुंबिक कलह आहे. ते पुढे म्हणाला, साहजिकच हा घटस्फोट नाही. धनुष आणि ऐश्वर्या सध्या चेन्नईत नाहीत. दोघेही सध्या हैदराबादमध्ये आहेत. मी त्या दोघांशी फोनवर बोललो आणि त्यांना सल्लाही दिला.
धनुषने ट्विटरवर पोस्ट करत पत्नी ऐश्वर्यापासून वेगळे झाल्याची घोषणा केली. त्याने लिहिले, 18 वर्षे आम्ही मित्र, कपल आणि पालक म्हणून एकत्र राहिलो. या प्रवासात आपण खूप काही पाहिलं. आज आमचे मार्ग वेगळे झाले आहेत. ऐश्वर्या आणि मी आता वेगळे होत आहोत. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आम्हाला आमची स्पेस द्या.
ऐश्वर्यानेही हीच पोस्ट तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.
जेव्हा धनुषने ऐश्वर्यासोबत लग्न केले तेव्हा धनुष फक्त 21 वर्षांचा होता आणि ऐश्वर्या 23 वर्षांची होती. दोघांचे लग्न तामिळ रितीरिवाजांनुसार झाले होते. या दोघांना दोन मुलगे असून एकाचे नाव यात्रा राजा आणि दुसऱ्याचे नाव लिंग राजा आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, धनुष आणि ऐश्वर्याची भेट 'कदल कोंडाएं' चित्रपटादरम्यान झाली होती. सिनेमाच्या मालकाने ऐश्वर्याची धनुषशी ओळख करून दिली आणि त्याच्या उत्कृष्ट अभिनयाबद्दल ऐश्वर्याने त्याचे अभिनंदन केले. यानंतर दुसऱ्या दिवशी धनुषला ऐश्वर्याकडून पुष्पगुच्छ देण्यात आला. ऐश्वर्याची ही गोष्ट धनुषला आवडली आणि त्यानंतर दोघेही मित्र झाले. या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. यानंतर 18 नोव्हेंबर 2004 रोजी दोघांनी लग्न केले.