ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार हॉस्पिटलमध्ये!

श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Dilip Kumar Hospitalised After Complaining Of Breathlessness
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार हॉस्पिटलमध्ये! 

थोडं पण कामाचं

  • ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार हॉस्पिटलमध्ये!
  • हिंदुजा हॉस्पिटलच्या नॉन कोविड विभागात दिलीप कुमार यांना दाखल केले
  • दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे

मुंबईः श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हिंदुजा हॉस्पिटलच्या नॉन कोविड विभागात दिलीप कुमार यांना दाखल केले आहे. याआधीही दिलीप कुमार यांना काही वेळा श्वास घेण्यास त्रास होण्याची समस्या जाणवली आहे. हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर नितीन गोखले आणि श्वसनविकार तज्ज्ञ डॉक्टर जलील पारकर यांच्या नेतृत्वात मेडिकल टीम दिलीप कुमार यांच्यावर उपचार करत आहे. Dilip Kumar Hospitalised After Complaining Of Breathlessness

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार ९८ वर्षांचे आहेत. यामुळे उपचार करण्याआधी काही चाचण्या करुन घेण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे. या चाचण्या सुरू आहेत. दिलीप कुमार यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा यासाठी हितचिंतकांनी प्रार्थना करावी, असे आवाहन त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी केले आहे. 

याआधी मागच्या महिन्यात दिलीप कुमार यांना दोन दिवसांसाठी हिंदुजा हॉस्पिटलच्या नॉन कोविड विभागात दाखल केले होते. काही चाचण्या केल्यानंतर त्यांना तब्येत स्थिर असल्यामुळे घरी जाण्याची परवानगी दिली होती. 

कोरोना संकट सुरू झाल्यापासून सातत्याने दिलीप कुमार आणि सायरा बानो पुरेशी खबरदारी घेत आहेत. या संदर्भात सोशल मीडियावर दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्यावतीने माहिती देण्यात आली होती. दोघांनी नागरिकांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करा, घरी राहा आणि सुरक्षित राहा अशा स्वरुपाचे आवाहन केले होते.

मागच्या वर्षी दिलीप कुमार यांच्या दोन भावांचे कोरोनामुळे निधन झाले. इशान खान (९०) आणि अस्लम खान (८८) यांना कोरोना झाल्यामुळे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. वय आणि कोरोनामुळे आलेला अशक्तपणा सहन झाला नाही आणि दोघांचेही निधन झाले. हा एक मोठा धक्का होता पण या धक्क्यातून सावरत असल्याचे दिलीप कुमार यांच्यावतीने माध्यमांना सांगण्यात आले होते. 

दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी ब्रिटिश इंडियात झाला. फाळणीनंतर त्यांचे जन्मस्थळ पाकिस्तानचा भाग झाले पण हिंदी सिनेसृष्टीत करिअर करण्यासाठी मुंबईत आलेले दिलीप कुमार कायमचे भारतात स्थिरावले. हिंदी सिनेसृष्टीत अनेक दर्जेदार चित्रपटांमधून अभिनय करणारे दिलीप कुमार हे त्या काळात ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जात होते. अलिकडेच पाकिस्तान सरकारने पेशावरमधील दिलीप कुमार आणि राज कपूर या दोघांच्या घरांचे संग्रहालयात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला. घरांचे संग्रहालय करण्यासाठी दिलीप कुमार आणि राज कपूर या दोघांची पाकिस्तानमधील घरे खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारने ताब्यात घेण्याचा आदेश दिला.

भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने दिलीप कुमार यांचा २०१५ मध्ये गौरव केला. याआधी २००० ते २००६ या काळात दिलीप कुमार राज्यसभेवर नामनिर्देशीत खासदार होते. त्यांना १९९४ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने आणि १९९१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. दिलीप कुमार १९७९ ते १९८२ या काळात मुंबईचे शेरिफ होते. दिलीप कुमार यांना त्यांच्या कार्यकाळात आठ वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पाकिस्तान सरकारने १९९८ मध्ये दिलीप कुमार यांना निशान ए इम्तियाझ या पुरस्काराने गौरविले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी