Panipat First look: ऐतिहासिक ‘पानिपत’ सिनेमातील अर्जुन कपूर आणि कृती सेनॉनचे फर्स्ट लूक पोस्टर

बी टाऊन
Updated Nov 04, 2019 | 19:01 IST | चित्राली चोगले

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानिपत सिनेमाबद्दल सध्या प्रचंड उत्सुकता आहे. सिनेमाचं पहिलं पोस्टर आणि संजय दत्तचा लूक रिलीज केल्यानंतर आता सिनेमातील २ मुख्य पात्रं अर्जुन कपूर-कृती सेनॉनचे लूकसुद्धा रिलीज केलेत.

first look posters of arjun kapoor and kriti sanon from magnum opus historic film panipat are out
Panipat First look: ऐतिहासिक ‘पानिपत’ सिनेमातील अर्जुन कपूर आणि कृती सनॉनचे फर्स्ट लूक पोस्टर भेटीला  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • संजय दत्तच्या लूकनंतर 'पानिपत' सिनेमातील अजून २ मुख्य पात्रांचे लूक झाले रिव्हील
  • अर्जुन कपूर आणि कृती सनॉनचे लूक देखील ठरले सोशल मीडियावर सुपरहिट
  • आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानिपत सिनेमा येत्या ६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानिपत हा सिनेमा मध्यंतरी जाहीर झाला आणि त्याबद्दल बरीच चर्चा रंगली. सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतच भेटीला आलं आणि सिनेमाने प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली. पानिपत या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिनेमाचा ट्रेलर सुद्धा लवकरच भेटीला येणार असं जाहीर झालं पण त्या आधी सिनेमाच्या मेकर्सनी प्रेक्षकांना एक खास सरप्राईज दिलं. सिनेमातील मुख्य खलनायक असलेल्या अहमद शहा अब्दाली म्हणजेच अभिनेता संजय दत्तचा सिनेमातला लूक रिव्हील केला गेला. संजयचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज होताच सिनेमातील इतर मुख्य पात्रांचे फर्स्ट लूक सुद्धा भेटीला येतील असा अंदाज वर्तवला गेला. अखेर ते अंदाज आता खरा ठरला आहे.

पानिपत या सिनेमात संजय दत्त हा मुख्य खलनायक असेल तर त्याच्या अपोजिट नायक म्हणून उभा ठाकणार आहे अर्जून कपूर. तिसऱ्या महायुद्धावर आधारित  ऐतिहासिक सिनेमा पानिपतमध्ये अर्जुन सदाशिवराव भाऊ यांची भूमिका साकारताना दिसेल. त्याच्या या भूमिकेचा फर्स्ट लूक आता रिव्हील केला गेला आहे, ज्याला उत्तम प्रतिसाद सोशल मीडियावर मिळत आहे. रिलीजच्या अवघ्या काही तासात या अर्जुनच्या फर्स्ट लूक पोस्टरला त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दीड लाखांच्या घरात लाइक्स मिळाले आहेत. हे पोस्टर खुद्द अर्जुनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत त्याला कॅप्शन दिलं आहे, 'सदाशिवराव भाऊ- तुमचा ज्या गोष्टीवर विश्वास असतो त्यासाठी उभं राहणं यालाच साहस म्हणतात. मग त्यासाठी तुम्ही एकटे उभे असलात तरी सुद्धा. पानिपत ट्रेलर उद्या भेटीला.’

अर्जुनसोबतच सिनेमातील अजून एक मुख्य पात्र असलेल्या कृती सेनॉनचा फर्स्ट लूक सुद्धा रिलीज केला गेला आहे. कृती सिनेमात पार्वतीबाईंची भूमिका साकारताना दिसेल. या भूमिकेसाठी एका मराठमोळ्या लूकमध्ये कृती पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. हा मराठमोळा लूक असलेलं सिनेमाचं फर्स्ट लूक पोस्टरसुद्धा रिलीज झालं असून त्याला सुद्धा खूप उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कृतीने सुद्धा तिचा हा लूक तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला असून त्याला तिने कॅप्शन दिलं आहे, 'पार्वतीबाई- एका खऱ्या राणीला मुकुटाची गरज नसते. पानिपत ट्रेलर उद्या भेटीला.' कृतीच्या या फर्स्ट लूक पोस्टरला रिलीजच्या अवघ्या काही तासात फक्त तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सहा लाखांच्या घरात लाइक्स मिळाले आहेत.


अर्जुन आणि कृतीने हे पोस्ट शेअर करत आपल्या सहकलाकारांनासुद्धा त्यामध्ये टॅग केलं आहे. सध्या सिनेमातील या महत्त्वाच्या कलाकारांचे फर्स्ट लूक रिव्हील केले गेले आहेत तर उद्या म्हणजे मंगळवारी सिनेमाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज होणार आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या सिनेमाचं संगीत मराठमोळी भावंडांची जोडी असलेल्या अजय-अतुल यांनी केलं आहे. बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ऐतिहासिक सिनेमा पानिपत येत्या ६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी