Lawrence Bishnoi: सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी अद्याप तपास सुरू असून या हत्येमागील सर्व गुपिते उघड करण्यासाठी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची पोलिस चौकशी सुरू आहे. पंजाब पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला रिमांडवर घेतले आहे आणि सिद्धू मुसेवालाच्या खून प्रकरणाचा तपास करत आहे. तसेच लॉरेन्स बिश्नोई प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या एका जुन्या प्रकरणात त्याची चौकशी करत आहे.
वास्तविक, काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खानचे नाव समोर आल्यानंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने काळवीटाची शिकार केल्यामुळे सलमान खानलाही ठार मारण्याची धमकी दिली होती.
फक्त एक कमतरता राहिली, नाहीतर...: बिश्नोई
या प्रकरणी पोलिसांनी लॉरेन्सलाही अटक केली होती आणि त्याचा एक साथीदार संपत नेहरा यालाही अटक करण्यात आली होती, ज्याच्यावर खुनाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याबद्दल लॉरेन्सने खुलासा केला आहे की, त्याने सलमान खानची हत्या केली असती, फक्त एक कमतरता होती, ज्यामुळे ही घटना पार पाडता आली नाही.
रायफल नसल्यामुळे फसला प्लॅन
पंजाब पोलिसांच्या चौकशीत लॉरेन्सने खुलासा केला की, 2018 सालीच अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता आणि संपत नेहराला या कामाची जबाबदारी देऊन मुंबईला पाठवले होते. संपत नेहराने काम पूर्ण करण्यासाठी सलमान खानच्या घराची रेकीही केली होती. रेकी केल्यानंतर त्याच्या असे लक्षात आले की, सलमानच्या आजूबाजूला सुरक्षा व्यवस्था खूप असते. त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहचणं कठीण आहे.. त्यावेळी संपत नेहराकडे फक्त एक रिव्हॉल्व्हर होती आणि हत्या करण्यासाठी त्याला स्प्रिंग रायफलची गरज होती जेणेकरून सलमान खानला दुरून लक्ष्य करता आलं असतं.
4 लाख रुपयांना खरेदी केली स्प्रिंग रायफल
संपत नेहराने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई स्प्रिंग रायफलची मागणी केली होती आणि त्यानंतर लॉरेन्सने स्प्रिंग रायफल खरेदीचे काम दिनेश डागर या गुन्हेगाराला दिले होते. यानंतर दिनेशचा मित्र अनिल पांडे याला चार लाख रुपयेही देण्यात आले होते आणि त्याच्याकडून स्प्रिंग रायफल मिळविण्यात आली होती.
या सगळ्यानंतर पुन्हा एकदा प्लॅन तयार झाला आणि सलमानच्या घराजवळ पुन्हा एकदा रेकी करण्यात आली. दरम्यान, 2018 साली दिनेश डागरच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे सलमानच्या हत्येचा प्लॅन फसला. यानंतरही संपत नेहरा मुंबईतच राहत होता आणि योग्य वेळेची वाट पाहत होता, मात्र पोलिसांनी तपास अधिक तीव्र केल्यावर त्याने मुंबईतून पळ काढला.
कोण आहे संपत नेहरा?
संपत नेहरा हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा खास माणूस मानला जातो. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या अनुपस्थितीत संपत नेहरा टोळीचे महत्त्वाचे निर्णय घेत असे. संपत नेहरा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या इतका जवळचा आहे की त्याला लॉरेन्सच्या प्रत्येक प्लॅनिंगची माहिती होती आणि लॉरेन्स कुठे जात आहे, कोणाला भेटत आहे याची त्याला माहिती असायची.
संपत नेहरा हा लॉरेन्स बिश्नोई याचा उजवा हात होता. त्यामुळे सलमान खानच्या हत्येची जबाबदारी संपत नेहरावरच सोपवली होती, मात्र पोलिसांनी तपास अधिक तीव्र केल्यावर संपत नेहराला अटक करण्यात आली आणि पोलीस चौकशीत त्याने लॉरेन्सची सगळी गुपिते उघड केली. त्यातच त्याने सलमान खानला मारण्यासाठी जो कट रचला होता त्याविषयी देखील माहिती दिली. संपत नेहरावरही लॉरेन्सप्रमाणे अनेक गुन्हे दाखल आहेत.