Karan Johar on KGF : गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी अशी तुलनात्मक चर्चा होत आहे. विशेषतः गेल्या काही महिन्यात दाक्षिणात्य सिनेमे आणि त्यांचे हिंदी रिमेक हिट होत आहेत, तर बॉलिवूडचे तमाम हिंदी चित्रपट फ्लॉप होत आहेत. चाहते ओटीटी फ्लॅटफॉर्मकडं वळत असल्यामुळे त्यांना अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे हिंदी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची पावलं चित्रपटगृहाकडे वळेनाशी झाली आहेत. मात्र त्याचवेळी भव्यदिव्यपणामुळे दाक्षिणात्य चित्रपट पाहायला मात्र प्रेक्षक गर्दी करत आहेत. यावरून चर्चा सुरू असतानाच दिग्दर्शक करन जोहरने वादात उडी घेत आपलं मौन सोडलं आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या तुलनेत हिंदी चित्रपटांच्या निर्मात्यांना कमी स्वातंत्र्य असल्याचा मुद्दा निर्माता करन जोहरनं मांडला आहे. आम्ही घेत असलेले विषय आणि त्याच्या मांडणीबाबत घालण्यात येणाऱ्या मर्यादा या बॉलिवूडसाठी वेगळ्या आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसाठी वेगळ्या आहेत. त्याचा परिणाम चित्रपटाची निर्मिती करताना साहजिकपणे होत असल्याचं मत करन जोहरनं व्यक्त केलं आहे.
नुकत्याच हिट झालेल्या KGF 2 या सिनेमात दाखवण्यात आलेल्या दृश्यांप्रमाणे आम्ही जर आमच्या सिनेमात दृश्यं आणि संवाद दाखवले असते, तर काय परिस्थिती उद्भवली असती, याची तुम्ही कल्पना करू शकता, असं करन जोहरनं म्हटलं आहे. तितक्या उघडपणे आम्ही आमचं म्हणणं मांडलं असतं तर कदाचित आमचं मॉब लिंचिंग झालं असतं, असं मत त्यानं व्यक्त केलं आहे. अर्थात, KGF 2 हा सिनेमा आपल्याला प्रचंड आवडला असून अशा प्रकारचे चित्रपट भारतात निर्माण होणं ही आनंदाची आणि अभिमानाचीच बाब असल्याचं मत करन जोहरनं व्यक्त केलं आहे.
गेल्या काही दिवसांत सातत्याने बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होत आहेत. चित्रपट निर्मात्यांना स्वातंत्र्य नसल्यामुळेच हे घडत असल्याचं कारण करन जोहरनं पुढं केलं आहे. गेल्या काही दिवसांत केजीएफ टू या सिनेमानं घवघवीत यश मिळवलं आहे. 14 एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. जगभरात आतापर्यंत या चित्रपटानं 1200 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
आधिक वाचा - Amazing Painting : डोळ्यांत मीठ टाकून आणि पट्टी बांधून काढलं सोनू सूदचं पेंटिंग, कला पाहून सगळेच झाले थक्क
गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड सिनेमे ओळीनं फ्लॉप झाले आहेत. अनेक मोठे चेहरे असणारे आणि मोठं बॅनर असणारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काहीच कमाल करू शकले नाहीत. शाहीद कपूरचा जर्सी, अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांचा रनवे 34, टायगर श्रॉफचा हिरोपंती 2, कंगना राणौतचा धाकड, रणवीर सिंहचा जयेशभाई हे चित्रपट जोरदार आपटले आहेत. नुकताच अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज हा चित्रपटही फ्लॉप झाला आहे.