कंगना अभिनयासोबतच करणार आणखी एक व्यवसाय

अभिनेत्री कंगना अभिनयाव्यतिरिक्त आणखी एका क्षेत्रात कार्यरत होणार आहे.

Kangana investing money in new venture
कंगना अभिनयासोबतच करणार आणखी एक व्यवसाय 

थोडं पण कामाचं

  • कंगना अभिनयासोबतच करणार आणखी एक व्यवसाय
  • भागीदारीत व्यवसाय करणार
  • नव्या व्यवसायाची माहिती देण्यासाठी ट्वीट केले फोटो

मुंबईः अभिनेत्री कंगना अभिनयाव्यतिरिक्त आणखी एका क्षेत्रात कार्यरत होणार आहे. कंगना व्यावसायिक म्हणून प्रतिष्ठा कमावण्यास इच्छुक आहे. यासाठी कंगना लवकरच रेस्टॉरंट आणि कॅफे या क्षेत्रात भागीदारीत व्यवसाय करणार आहे. या व्यवसायासाठी कंगनाने भागीदारीचा करार केला आहे. लवकरच कंगना आणि तिचे व्यावसायिक सहकारी मनाली परिसरात रेस्टॉरंट आणि कॅफे सुरू करत आहेत. या ठिकाणी वेगवेगळे रुचकर पदार्थ चाखण्याची सुवर्णसंधी खवय्यांना मिळणार आहे. (Kangana Ranaut opens cafe and restaurant in Manali)

कंगनाने निवडक फोटो ट्वीट केले आहे. यात ती रेस्टॉरंट आणि कॅफे या क्षेत्रातील भागीदारांसोबत व्यावसायिक मुद्यांवर चर्चा करताना दिसत आहे. व्यावसायिक बाबी गंभीरपणे ऐकून समजून घेत असलेली कंगना फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे. कंगना सोबत तिची बहीण रंगोली आणि भाऊ दिसत आहेत. 

फूड आता फॅशन झाली आहे. लोकांना वेगवेगळे पदार्थ आकर्षक मांडणीत बघायला आणि खायला आवडतात. याच कारणामुळे खवय्यांसाठी एक नवा छान अनुभव निर्माण करण्याच्या उद्देशाने रेस्टॉरंट आणि कॅफे या क्षेत्रात व्यावसायिक पदार्पण करत असल्याचे कंगनाने जाहीर केले. ती एक छोटी नवी सुरुवात करत आहे. सहकाऱ्यांची मोलाची साथ असल्यामुळेच अतिशय ठामपणे नव्या क्षेत्रात प्रवेश करुन एक-एक पाऊल टाकत असल्याचे कंगना म्हणाली. कंगनाने तिच्या संपूर्ण टीमचे जाहीर आभार मानले. (Kangana investing money in new venture)

अभिनेत्री कंगना हीच अभिनय क्षेत्रातील काम जोरात सुरू आहे. लवकरच ती धाकड सिनेमात दिसणार आहे. अविकडेच या सिनेमातील निवडक दृश्यांचे शूटिंग मध्य प्रदेशमध्ये पार पडले. कंगनाने सोशल मीडियावर धाकड सिनेमाच्या सेटवरील काही फोटो शेअर केले. धाकड व्यतिरिक्त अभिनेत्री कंगना मणिकर्णिका रिटर्न्स, थलाइवी, तेजस या सिनेमांमध्येही दिसणार आहे. एका हिंदी सिनेमात कंगना माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. 

अभिनय, सिनेमा निर्मिती आणि वितरण तसेच रेस्टॉरंट आणि कॅफेचा व्यवसाय अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कंगना कार्यरत झाली आहे. अभिनेत्री कंगनाच्या आधी अनेक सेलिब्रेटींनी हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये नागरिकांना रुचकर पदार्थ खाऊ घालण्यासाठी काही सेलिब्रेटी तर मोठ्या फूड चेन व्यवसायात सहभागी झाले आहेत. आता या क्षेत्रात कंगनाची भर पडली आहे. पण या व्यवसायात यश मिळवू असा विश्वास कंगनाने व्यक्त केला. टीमच्या मदतीने नव्या व्यवसायातील खाचाखोचा व्यवस्थित समजून घेत असल्याचे कंगनाने सांगितले.

याआधी अभिनेत्री कंगना तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत राहिली आहे. अनेकदा प्रस्थापित असलेल्या बॉलिवूडच्या दिग्गजांविरुद्ध बोलणारी कंगना अनेकांच्या कौतुकाचा तसेच काही जणांच्या टीकेचा विषय झाली आहे. देशप्रेम जाहीरपणे व्यक्त करणे, निवडक व्यक्ती आणि त्यांच्या कृतीवर सडकून टीका करणे यामुळे कंगनाच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आकस्मिक मृत्यूनंतर संशयाचे धुके निर्माण झाले. सुशांतने आत्महत्या केली की त्याला आत्महत्या करण्यासाठी कोणी भाग पाडले की कोणी हत्या करुन नंतर आत्महत्येचे चित्र उभे केले असे असंख्य प्रश्न विचारले जाऊ लागले. या विषयावर कंगनाने अनेक बेधडक प्रतिक्रिया दिल्या. गंभीर स्वरुपाचे आरोप केले. बॉलिवूडमधील गटबाजी (नेपोटिझम), फक्त पसंतीच्या व्यक्तींना संधी देण्याची प्रवृत्ती, वशिलेबाजी या विरोधात कंगनाने नाराजी व्यक्त केली. बॉलिवू़डमधील काही दिग्गज अभिनयासोबतच अंमली पदार्थांच्या जाळ्यात गुरफटले आहेत. काही जण फक्त अंमली पदार्थांचे सेवन करतात तर काही जण अंमली पदार्थांच्या तस्करीतही गुंतले आहेत. या संदर्भात कंगनाने अनेक धक्कादायक वक्तव्ये केली. 

महाराष्ट्र शासन आणि कंगना यांच्यात काही मुद्यांवर जोरदार संघर्ष झाला. मुंबई मनपाने कंगनाच्या ऑफिसरुपी घराचा काही भाग तोडला. हे प्रकरण न्यायालयात गेले. यथावकाश मुंबई मनपा आणि कंगना यांनी सामंजस्याने हा विषय मिटवण्याचा निर्णय घेतला. दंड भरायला सांगून कंगनाला तिचे बांधकाम नियमित करुन घेण्याची संधी देण्याची तयारी मुंबई मनपाने दाखवली. 

कोरोना संकटात लॉकडाऊनमुळे अनेक कारभार ठप्प होते. या काळात कंगना आणि महाराष्ट्रात सत्तेत असलेली शिवसेना यांच्यातील संघर्ष हा माध्यमांसाठी चघळण्याचा नवा मोठा विषय झाला होता. पण हे सर्व मागे टाकत कंगना सध्या अभिनय, सिनेमा निर्मिती आणि वितरण तसेच रेस्टॉरंट आणि कॅफेचा व्यवसाय या वेगवेगळ्या क्षेत्रात एकाच वेळी दमदार कामगिरी करत असल्याचे चित्र आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी