मुंबई मनपाने २ कोटींची भरपाई द्यावी  - कंगना

Kangana Ranaut demand rs 2 crore from mumbai municipal corporation अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस बजावून अल्पावधीत कारवाई करणाऱ्या मुंबई मनपाने दोन कोटी रुपयांची भरपाई द्यावी अशी मागणी अभिनेत्री कंगनाने केली.

Kangana Ranaut demand rs 2 crore from mumbai municipal corporation
मुंबई मनपाने २ कोटींची भरपाई द्यावी  - कंगना 

थोडं पण कामाचं

  • मुंबई मनपाने २ कोटींची भरपाई द्यावी  - कंगना
  • कंगनाच्या सुधारित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात २२ सप्टेंबरला सुनावणी
  • कंगनाचा आक्रमक पवित्रा, शिवसेना-कंगना संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता

मुंबईः अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस बजावून अल्पावधीत कारवाई करणाऱ्या मुंबई मनपाने दोन कोटी रुपयांची भरपाई द्यावी अशी मागणी अभिनेत्री कंगना रणौत (Actress Kangana Ranaut) हिने केली. मुंबई महानगरपालिकेने (Municipal Corporation of Greater Mumbai - MCGM) कंगनाच्या ऑफिसमध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप करुन नोटीस बजावली. नोटीस बजावल्यानंतर कंगना मुंबईत (Mumbai) नसताना कमालीच्या वेगाने मनपा प्रशासनाने बांधकाम तोडले. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर नासधूस झाल्यामुळे कंगनाने मनपाकडून २ कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. भरपाईच्या मागणीमुळे कंगनाचा विषय आणखी काही काळ सक्रीय राहणार असे चित्र आहे. (Kangana Ranaut demand rs 2 crore from mumbai municipal corporation)

मुंबई मनपाने ऑफिस तोडण्याची कारवाई ज्या पद्धतीने केली त्याविरोधात कंगनाच्या वकिलाने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर प्रथमदर्शनी मुंबई मनपाने बदल्याच्या भावनेतून कारवाई केल्याचे मत व्यक्त केले. तसेच मनपाच्या कारवाईला स्थगिती दिली. मात्र न्यायालयाचा निर्णय येण्याआधीच मनपाची कारवाई पूर्ण झाली होती. या प्रकरणात पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला आहे. ही सुनावणी सुरू होण्याआधीच कंगनाने सुधारित याचिकेद्वारे मुंबई मनपाकडून २ कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली. कंगनाच्या मागणीवर न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

ऑफिसच्या जागेचे मूल्य ४८ कोटी रुपयांचे आहे. मनपाच्या कारवाईत ऑफिसच्या संपत्तीची हानी झाली, असे सांगत कंगनाने भरपाई मागितली आहे. याआधी मनपाने तोडून ठेवलेल्या ऑफिसमध्येच काम करणार असल्याचे कंगनाने जाहीर केले. हे अर्धवट तोडलेले ऑफिस म्हणजे एका महिलेवरचा अन्याय आहे, असे कंगना म्हणाली.

याआधी सुशांत प्रकरणात मुंबई पोलीस तपास करत असताना कंगनाने तपासकामाविषयी नाराजी व्यक्त केली होती. पोलिसांनी बॉलिवूडची काळी बाजू तपासली तर सुशांतच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यास मदत होईल, असे कंगना म्हणाली होती. मुंबई पोलीस सत्ताधाऱ्यांच्या दबावात सुशांत प्रकरणी तपास करत असल्याचा आरोप कंगनाने केला होता. तिने या प्रकरणात सत्ताधारी शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. तसेच मुंबई पोलिसांच्या सध्याच्या कामाच्या पद्धतीमुळे आपण मुंबईत नाही तर पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये असल्यासारखे वाटते असे कंगना म्हणाली होती.

कंगनाच्या मत प्रदर्शनावरुन शिवसेना आणि कंगना यांच्यात शाब्दिक मतभेद सुरू झाले. कंगनाला मुंबईत येऊनच दाखव यासह अनेक धमक्या देण्यात आल्या. धमक्या मिळू लागल्यावर थेट आव्हान स्वीकारुन कंगनाने मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. तिचा मुंबई दौरा जाहीर झाल्यानंतर मुंबई मनपा अचानक सक्रीय झाली. कंगनाच्या ऑफिसमधील अनधिकृत बांधकाम प्रकरणात प्रचंड वेगाने कारवाई झाली. 

ऑफिसवरील कारवाईमुळे कंगना आणि शिवसेना यांच्यात थेट शाब्दिक संघर्ष सुरू झाला. नंतर कंगनाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन स्वतःची बाजू मांडली. यानंतर ती हिमाचल प्रदेश येथील घरी रवाना झाली. कंगना मुंबईतून निघून गेल्यामुळे वाद शांत झाल्याची शक्यता व्यक्त होत होती. प्रत्यक्षात कंगनाने घरी पोहोचताच पुन्हा एकदा सत्ताधारी शिवसेनेला आव्हान दिले आहे. मुंबई मनपात अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. अशा परिस्थितीत मुंबई मनपाकडूनच कंगनाने भरपाई मागितली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी