Kangana Ranaut: राज्यपालांची भेट घेतल्यावर कंगना म्हणाली, "मला नक्कीच न्याय मिळेल"

Kangana Ranaut Meets Maharashtra Governor: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. मुंबईतील राजभवन येथे कंगनाने राज्यपालांची भेट घेतली. 

Kangana Ranaut meets maharashtra Governor Bhagat Singh Koshyari
अभिनेत्री कंगनाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • मुंबईतील राजभवन येथे अभिनेत्री कंगनाने घेतली राज्यपालांची भेट
  • आपल्यासोबत झालेल्या अन्यायाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिली माहिती - अभिनेत्री कंगना राणावत

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हिने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली आहे. राज्यपालांची भेट घेण्यासाठी कंगना राणावत राजभवन (Raj Bhavan Mumbai) येथे दाखल झाली होती. यावेळी कंगना सोबत तिची बहिण रंगोली सुद्धा उपस्थित होती. अभिनेत्री कंगना आणि राज्यपाल यांच्यातील ही भेट जवळपास १५ ते २० मिनिटे झाली. आपल्यासोबत झालेल्या अन्यायाबाबत मी राज्यपालांना सांगितल्याचं कंगना राणावत म्हणाली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यावर अभिनेत्री कंगना राणावत म्हणाली, माझ्यासोबत झालेल्या अन्यायाबद्दल मी राज्यपालांना सांगितले. मी कुणी राजकीय व्यक्ती नाहीये. राज्यपालांनीही माझं ऐकूण घेतलं. मला विश्वास आणि अपेक्षा आहे की मला नक्कीच न्याय मिळेल. देशभरातील महिलांसाठी हा न्याय अत्यंत गरजेचा आहे. मी भाग्यवान आहे की राज्यपालांनी माझं म्हणंणं आपल्या मुलीप्रमाणे ऐकूण घेतलं असंही कंगनाने म्हटलं आहे.

कंगना राणावत हिच्या मुंबईतील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवला होता. मुंबई मनपाच्या या कारवाई विरोधात कंगनाने न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने ही कारवाई स्थगित देत बीएमसीला यावर आली बाजू मांडण्यास सांगितलं आहे. बीएमसीने केलेल्या या कारवाईनंतर आता कंगनाने राज्यपालांची भेट घेतल्याने या भेटीला एक विशेष महत्व प्राप्त झालं आहे.

अभिनेत्री कंगनाने मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर कंगना आणि शिवसेना यांच्यात चांगलेच वाकयुद्ध सुरू झाले. कंगना मुंबईत परतण्यापूर्वीच तिच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर बीएमसीने हातोडा चालवला. यानंतर कंगनाने ट्वीटरवर एक व्हिडिओ पोस्ट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपमानास्पद भाषा वापरल्याने कंगनाच्या विरोधात मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी