Dhaakad Box Office Collection :बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना राणावत सध्या खूप चर्चेत आहे. तिचा 'धाकड' हा चित्रपट रिलीज झाला आहे. जो बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला. त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने केवळ ५ कोटींची कमाई केल्याचे सांगितले जात आहे.
एवढचं नाही तर हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर एका आठवड्यात मुंबईतील सर्व सिनेमागृहांमधून हटवण्यात आला आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा 'भूल भुलैया 2' हा चित्रपटसुद्धा धाकडच्या स्पर्धेत रिलीज झाला होता, मात्र, या चित्रपटाने धाकडला मागे टाकले. 'भूल भुलैया 2' या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिनेमाचे सगळे शो हाऊसफुल्ल जात आहेत.
बुक माय शोमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी कोणताही शो नाही. याशिवाय हा चित्रपट दिल्लीतील काही सिनेमागृहांमध्येच सुरू असल्याचंही समजतंय. बाकीच्या सिनेमागृहांमधून हटवण्यात आल्याचेही वृत्त आहे. हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर रिलीज झाला. समारे 2100 स्क्रीन्स सिनेमाला मिळाल्या होत्या मात्र चित्रपट चालला नाही म्हणून तो काढून टाकण्यात आला.
धाकड सिनेमा बिग बजेट आहे. या सिनेमासाठी 80 कोटी ते 90 कोटी रुपयांच्या दरम्यान खर्च आला. बॉलीवूड हंगामाच्या अहवालानुसार, निर्मात्यांनी रिलीज होण्यापूर्वी डील पूर्ण न केल्यामुळे स्ट्रीमिंग वितरणासाठीही संघर्ष करावा लागत आहे.
धाकड सोबत एकाच वेळी रिलीज झालेला हॉरर-कॉमेडी सिक्वेल भूल भुलैया 2 ने खूप नफा कमावला आहे. हा सिनेमा या वीकेण्डला 100 कोटींचा टप्पा पार करेल.
अनीस बज्मी दिग्दर्शित, जो 2007 च्या चित्रपटाचा सिक्वेल आहे, त्यात कार्तिक आर्यन, तब्बू आणि कियारा अडवाणी आहेत.