मुंबई पोलिसांनी केली बिहार पोलिसांची अडवणूक

mumbai police halts bihar police अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन महाराष्ट्र आणि बिहार असा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांची अडवणूक सुरू केली आहे. 

mumbai police halts bihar police
मुंबई पोलिसांनी केली बिहार पोलिसांची अडवणूक 

थोडं पण कामाचं

  • मुंबई पोलिसांनी केली बिहार पोलिसांची अडवणूक
  • रियाचा निर्दोष असल्याचा दावा करणारा व्हिडीओ
  • मुंबई पोलिसांच्या तपासावर सुशांतच्या कुटुंबातील सदस्यांना अविश्वास

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Actor Sushant Singh Rajput) प्रकरणावरुन महाराष्ट्र (Maharashtra) आणि बिहार (Bihar) असा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) दीड महिन्यापासून सेलिब्रेटींची चौकशी करत आहेत. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. तपासाबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. मात्र बिहार पोलिसांचा (Bihar Police) तपास सुरू झाल्यापासून मुंबई पोलीस दलामध्ये अस्वस्थता पसरली आहे. याच अस्वस्थतेतून मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांची अडवणूक (mumbai police halts bihar police) सुरू केली आहे. 

बिहार पोलिस मुंबईत आले त्यावेळी त्यांना सहकार्य करण्याचे तोंडी आश्वासन देण्यात आले. प्रत्यक्षात तपासाकरिता बिहार पोलिसांना मुंबई पोलीस दलाने वाहन उपलब्ध करुन दिले नाही. अखेर बिहार पोलिसांनी रिक्षा पकडून तपास सुरू केला. सुशांतच्या बँक खात्यांची तसेच त्या खात्यांमधून झालेल्या अनेक आर्थिक व्यवहारांची माहिती मिळवण्यात बिहार पोलीस यशस्वी झाले. ही माहिती मिळाल्यानंतरच बिहार पोलिसांच्या पत्रामुळे आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची तयारी ईडीने सुरू केली.

बिहार पोलिसांची टीम सुशांतची एक्स गर्लफ्रेंड, अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या घरी गेली. सुशांत संदर्भात अंकिताची चौकशी करण्यात आली. याच पद्धतीने बिहार पोलिसांनी रियाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र रिया घरात नसल्याचे दरवाजातच त्यांना सांगण्यात आले. घरात प्रवेश करुन शोध घेण्यासाठी वॉरंट नसल्यामुळे बिहार पोलिसांनी तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. रात्री परतत असलेल्या बिहार पोलिसांच्या टीमला प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गाठले. मात्र माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याआधीच मुंबई पोलिसांच्या अचानक आलेल्या मोबाइल व्हॅनने बिहार पोलिसांना अडवले. बिहार पोलिसांना रिक्षातून तपासकाम करण्यासाठी भाग पाडणाऱ्या मुंबई पोलिसांनी अडवणूक करुन बिहार पोलिसांना तातडीने माध्यमांपासून दूर नेण्यासाठी मोबाइल व्हॅनचा (पोलीसांचे मोठे वाहन) वापर केला. 

याआधी सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये पाटणा येथील राजेंद्रनगर पोलीस ठाण्यात एक तक्रार केली. या तक्रारीत त्यांनी रिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांनी सुशांतला लुबाडल्याचा आरोप केला. या तक्रारीआधारे बिहार पोलिसांची एक टीम तपास करण्यासाठी मुंबईत आली. त्यांनी सुशांतच्या सर्व बँक खात्यांचे व्यवहार तपासले. या तपासानंतर बिहार पोलिसांनी आर्थिक गुन्ह्यांचा सखोल तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाला (Enforcement Directorate - ED) एक पत्र पाठवले. पत्राद्वारे बिहार पोलिसांनी आर्थिक व्यवहारांच्या सखोल तपासणीची आवश्यकता सांगून तपास करण्याची विनंती केली. ईडीने मागणी केल्यानंतर बिहार पोलिसांनी सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीची प्रत त्यांना पाठवून दिली तसेच पोलीस तपासाची प्राथमिक माहिती दिली. या माहितीआधारे ईडीने आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल करुन (Sushant Singh Rajput case ED files money laundering case) तपास सुरू केला आहे. लवकरच रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना चौकशीसाठी समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे. 

रियाचा निर्दोष असल्याचा दावा करणारा व्हिडीओ

बिहार पोलिसांना भेटणे टाळणाऱ्या रियाने (reha chakravarthi) एक शॉर्ट व्हिडीओ प्रसिद्ध केला. या व्हिडीओमध्ये रियाने सुशांतच्या वडिलांनी केलेले आरोप फेटाळले आणि निर्दोष असल्याचा दावा केला. 

मुंबई पोलिसांच्या तपासावर सुशांतच्या कुटुंबातील सदस्यांना अविश्वास

सुशांतच्या कुटुंबातील सदस्यांनी मुंबई पोलिसांच्या तपास कामावर अविश्वास जाहीर केला आहे. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या बँक खात्यांची आणि आर्थिक व्यवहारांची जास्त माहिती घेतली नाही. तपास योग्य दिशेने सुरू आहे असे मुंबई पोलीस सांगतात पण त्यांनी रिया आणि तिच्या कुटुंबाविरोधात एकही आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गुन्हा दाखल केलेला नाही, असे सुशांतच्या नातलगांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. मुंबई पोलीस तपास करत असताना सीबीआय तपासाची मागणी करणारी रिया बिहार पोलिसांनी चौकशी सुरू करताच सर्व तपास मुंबई पोलिसांनी करावा, अशी भूमिका घेत आहे. अचानक मुंबई पोलिसांच्या कामावर रियाला प्रचंड विश्वास वाटण्यामागचे रहस्य काय आहे, असा प्रश्न सुशांतच्या नातलगांनी उपस्थित केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी