ऑस्करच्या ९३ वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदाच महिलेला मिळाला बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार

बी टाऊन
Updated Apr 27, 2021 | 16:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Oscar 2021: ऑस्करचा यावर्षीचा बेस्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार यंदा क्लोई शाओ या महिलेला मिळाला आहे. ऑस्करच्या इतिहासात दुसऱ्यांदाच एका महिला दिग्दर्शकाला हा पुरस्कार मिळाला आहे.

In the history of Oscars, only second time female director gets award
क्लोई शाओ यांना बेस्ट डायरेक्टरचा ऑस्कर 

थोडं पण कामाचं

  • बेस्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार यंदा क्लोई शाओ
  • १६ टक्के सिनेमे बनवले महिलांनी
  • सॅन डिएगो विद्यापीठाचा अभ्यास

नवी दिल्ली : काल रात्री २०२० साठीच्या अॅकेडमी पुरस्कारांची घोषणा झाली. सिनेमाच्या चाहत्यांची हा एक उत्सवच असतो. कालचा दिवस महिलांसाठी विशेष होता. क्लोई शाओ या आशियाई महिला दिग्दर्शकाला बेस्ट डायरेक्टरच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ऑस्करच्या इतिहासात दुसऱ्यांदाच एका महिला दिग्दर्शकाला हा पुरस्कार मिळाला आहे. शिवाय ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाचवेळी दोन-दोन महिलांना बेस्ट फिल्म आणि बेस्ट डायरेक्टरच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. 

महिलांचे स्थान


कोरोना काळात सर्व जगानेच आपल्या आनंदाला तिलांजली दिली आहे. अमेरिकेतील सॅन डिएगो विद्यापीठाने एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार या वर्षी सिनेमाच्या क्षेत्रात महिलांनी एक नवा विक्रम बनवला आहे. यावर्षी महिलांनी चित्रपट विश्वात दिग्दर्शक, निर्माती, लेखक, कार्यकारी निर्माती, सिनेमॅटोग्राफर आणि संपादनाच्या क्षेत्रात एक नवा विक्रम केला आहे. याआधी एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांचे नाव चित्रपटाशी जोडलेले नव्हते. २०२० मधील सर्वात मोठा आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमधील १६ टक्के सिनेमा महिलांनी बनवला आहे. २०१९ मध्ये हेच प्रमाण १२ टक्के होते. तर २०१८ मध्ये फक्त ४ टक्के होते.

सॅन डिएगो विद्यापीठाचा अभ्यास


सॅन डिएगो विद्यापीठातील Centre for the Study of Women in Television and Film ला आपल्या अभ्यासात असे दिसून आले की २०२०मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १०० चित्रपटांमधील २१ टक्के चित्रपटांमध्ये महिलांनी डायरेक्टर, सिनेमॅटोग्राफर, लेखिका, निर्माती, कार्यकारी निर्माती आणि एडिटरचे काम केलेले आहे.

जास्तीत जास्त चित्रपटांमध्ये योगदान दिल्यामुळे अर्थातच महिलांना मिळणाऱ्या नामांकनाचेही प्रमाण वाढले आहे. ऑस्करमध्ये पहिल्यांदाच घडले की तीन महिलांना एकाचवेळी डायरेक्टरच्या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले. क्लोई शाओ यांना नोमेडलॅंडसाठी आणि एमराल्ड फनेल ला प्रॉमिसिंग यंग वुमेन साठी नामांकन मिळाले होते. याशिवाय परदेशी भाषा चित्रपट श्रेणीत ट्युनिशियाच्या कॉथर बेन हानिया यांना त्यांच्या बहुचर्चित द मेन हू सोल्ड हिज स्किन या चित्रपटासाठी नामांकन मिळाले होते.

अनादर राऊंडला बेस्ट फॉरेन फिल्म


यावर्षी बेस्ट फॉरेन लॅग्वेज श्रेणीत पाच चित्रपटांना नामांकन मिळाले होते. त्यातील सर्वात जास्त चर्चा ट्युनिशियाचा चित्रपट द मेन हू सोल्ड हिज स्किन याची झाली होती. मात्र प्रत्यक्षात डेन्मार्कचा चित्रपट अनादर राऊंडला बेस्ट फॉरेन फिल्मचा पुरस्कार मिळाला. अॅकेडमी पुरस्कारांसाठी यावर्षी ३२ टक्के महिला आणि ६८ टक्के पुरुषांना नामांकन मिळाले होते. ३२ टक्के महिलांना नामांकन हा ऑस्करच्या इतिहासातील एक विक्रम आहे. याआधी महिलांना इतके नामांकन कधीच मिळाले नव्हते. अर्थात पुरस्कार मात्र मोठ्या संख्येने पुरुषांनाच मिळाले.

सर्वच क्षेत्रांप्रमाणे मनोरंजनाच्या क्षेत्रातही महिला आपला ठसा उमटवत आहेत. त्याचेच प्रतिबिंब ऑस्कर पुरस्कारांमध्येही पडलेले आहे. ऑस्करमध्ये दिवसेंदिवस महिलांचा दबदबा वाढतच चालला आहे हे याच वर्षीच्या पुरस्कारांनी दाखवून दिले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी