Jug Jug Jeeyo Film । मुंबई : करण जोहरच्या ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाचा अलीकडेच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. पाकिस्तानी गायक अबरार-उल-हकने चित्रपटाचा निर्माता करण जोहरवर त्याचे 'नाच पंजाबन' हे गाणे चोरल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानी गायक अबरारने धर्मा प्रॉडक्शन आणि करण जोहरवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. (Pakistani singer Abrar Ul Haq accused Karan Johar of stealing a song).
अधिक वाचा : वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची का करतात पुजा? वाचा सविस्तर
जुग जुग जिओच्या ट्रेलरमध्ये 'नाच पंजाबन' या गाण्याची झलक पाहायला मिळत आहे. यानंतर पाकिस्तानी गायकाने सोशल मीडियावर करण जोहर आणि धर्मा प्रॉडक्शनने त्याच्या परवानगीशिवाय हे गाणे चित्रपटात वापरले असल्याचे म्हटले आहे. अबरारने ट्विटकरून लिहले की, "मी माझे नाच पंजाबन हे गाणे कोणत्याही भारतीय चित्रपटाला विकले नाही. त्याचे अधिकार माझ्याकडे सुरक्षित आहेत त्यामुळे मी नुकसान भरपाईसाठी न्यायालयात जाऊ शकतो. करण जोहरसारख्या निर्मात्यांनी गाण्याची कॉपी करू नये. कॉपी केलेले हे माझे सहावे गाणे आहे. मी याची परवानगी देऊ शकत नाही."
अबरार-उल-हकने त्याच्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "नाच पंजाबन गाण्याची परवानगी कोणालाही दिलेली नाही. असा दावा कोणी करत असेल तर त्याने करार दाखवावा. नाहीतर मी कायदेशीर कारवाई करेन. सोशल मीडियावर अबरारच्या ट्विटवर युजर्स करण जोहरला ट्रोल करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, 'बॉलीवूडने साऊथ चित्रपट आणि हॉलिवूडची कॉपी सोडलेली नाही. तर तुझे गाणे का सोडतील? बॉलिवूड कॉपी मास्टर. या संपूर्ण प्रकरणात करण जोहर आणि त्याची कंपनी धर्मा प्रॉडक्शनकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
लक्षणीय बाब म्हणजे नाच पंजाबन हे गाणे २००० मध्ये प्रदर्शित झाले होते. हे गाणे खूप लोकप्रिय झाले. तसेच पाकिस्तानचा सिंगर अबरारबद्दल भाष्य करायचे झाले तर त्याला पाकिस्तानी पॉपचा राजा ही पदवी मिळाली आहे. गायनासोबतच तो राजकारणात देखील सक्रिय आहे.