मुंबई: नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात एका नवीन मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘चंद्रमुखी’. आपल्या लावण्यानं आणि घुंगराच्या ठेक्यांनी अनेकांना मोहित करणारी सौंदर्यवती, ‘चंद्रमुखी’ हे विश्वास पाटील यांच्या कादंबरीतलं एक महत्त्वाचं पात्र आहे. त्यांच्या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या मराठी चित्रपटाचं टीझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
‘चंद्रमुखी’ या चित्रपटाची निर्मिती प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर यांनी केली असून त्यांचा हा तिसरा चित्रपट असणार आहे. यापूर्वी ‘AB आणि CD’, ‘गोष्ट एका पैठणीची’ या दोन चित्रपटांची निर्मिती बर्दापूरकर यांनी केलीय. ‘AB आणि CD’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांनी काम केलं होतं. तर अभिनेत्री सायली संजीवनं आपल्या भूमिकेनं पैठणी भोवती गुंफलेली एक सुंदर गोष्ट सादर केली होती. आता कादंबरीवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला बर्दापूरकर घेऊन येत आहेत.
‘चंद्रमुखी’ ही राजकारण आणि तमाशा यांची उत्तम सांगड घालणारी विश्वास पाटील यांनी लिहिलेली कादंबरी आहे. तमाशात लावणी सादर करणारी नृत्यांगना, सौंदर्यवती अशा भूमिकेला अगदी सहजपणे शोभून दिसणारी आणि ‘चंद्रमुखी’च्या पात्राला अचूक न्याय देणारी अभिनेत्री कोण असेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.
प्रसिध्द लेखकाच्या प्रसिध्द लेखणीवर जेव्हा चित्रपट तयार केला जातो तेव्हा त्या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि पटकथा लेखन कोण करणार हा सहजपणे मनात येणारा प्रश्न असतो. कारण कादंबरीत जे मांडलंय ते पडद्यावर तितक्याच ताकदीनं मांडलं गेलं पाहिजे ही एक अपेक्षा आणि इच्छा असते. म्हणूनच चंद्रमुखी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी सांभाळली आहे. लेखकाचं मनोगत पडद्यावर मांडण्याचं प्रसाद ओक यांचं कौशल्य अनेकांनी त्यांच्या ‘हिरकणी’ या चित्रपटातून अनुभवलं आहे. ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचे पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांनी लिहिलेले आहे. ‘हिरकणी’ची लेखक-दिग्दर्शक जोडी ‘चंद्रमुखी’साठी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकारांची जोडी अजय-अतुल यांचं संगीत असणार आहे. तेव्हा आता सर्व जण नववर्षात ‘चंद्रमुखी’ला बघण्यासाठी उत्सुक असणार आहेत.