Priyanka Chopra And Nick Jonas Welcome A Baby Through Surrogacy : मुंबई : बॉलिवूड आणि हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास हे दांपत्य आई-बाबा झाले. सरोगसीद्वारे त्यांना अपत्यप्राप्ती झाली. प्रियांकाने सोशल मीडियाद्वारे ही माहिती शेअर केली. पुढचे काही दिवस प्रायव्हसी हवी आहे. कुटुंबाला वेळ द्यायचा आहे. आपण भावनांचा आदर कराल; असा विश्वासही चाहत्यांना उद्देशून प्रियांका चोप्राने व्यक्त केला आहे.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा विवाह २०१८ मध्ये झाला. लग्न झाल्यापासून वेगवेगळ्या कारणाने सतत चर्चेत राहिलेले हे दांपत्य आता आई-बाबा झाल्यामुळे पुन्हा प्रकाशझोतात आहे. प्रियांका-निक आई-बाबा झाल्याचे कळल्यापासून चाहत्यांनी तसेच दांपत्याला ओळखणाऱ्यांनी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये बॉलिवूडचे सेलिब्रेटी पण आहेत. अभिनेत्री हुमा कुरेशी, पूजा हेगडे, लारा दत्ता यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या दांपत्याचे अभिनंदन केले.
सरोगसीच्या पर्यायाची निवड करून अपत्यप्राप्ती करून घेण्याचा पर्याय अनेक सेलिब्रेटींनी निवडला आहे. अभिनेत्री प्रिती झिंटा, शिल्पा शेट्टी, शाहरूख खान, आमिर खान, तुषार कपूर, एकता कपूर, करण जोहर अशा अनेकांनी सरोगसीच्या पर्यायाची निवड केली आहे. या यादीत आता प्रियांका चोप्रा-निक जोनास या दांपत्याचाही समावेश झाला आहे.
सरोगसी या प्रक्रियेत पतीचे शुक्राणू आणि पत्नीचे बीजांड यांच्या मिलनातून झालेले भ्रूण दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयात सोडले जाते. या प्रक्रियेला सरोगसी म्हणतात. सरोगेट मातेने बाळाला जन्म दिल्यानंतर ते बाळ मूळ आई-वडिलांच्या ताब्यात दिले जाते. या प्रक्रियेत सरोगेट मातेविषयीची माहिती गुप्त राखली जाते. एखादी महिला कोणत्याही कारणामुळे गर्भधारण करण्यासाठी असमर्थ असेल तर सरोगसीच्या पर्यायाची निवड केली जाते. हा पर्याय मागील काही वर्षांपासून अनेक सेलिब्रिटी निवडू लागले आहेत.