एका वर्षातच तुटण्याच्या स्थितीत आलंय ‘या’ अभिनेत्याचं लग्न, पत्नीसोबत वितुष्ट

बी टाऊन
Updated Mar 31, 2020 | 14:39 IST | टाइम्स नाऊ हिंदी

अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतिकनं २३ जानेवारी २०१९ ला आपली लाँगटर्म गर्लफ्रेंड असलेल्या सान्या सागर सोबत लग्न केलं होतं. आता दोघांच्या नात्यात दुरावा आल्याची माहिती मिळतेय.

Raj Babbar
एका वर्षातच तुटण्याच्या स्थितीत आलंय ‘या’ अभिनेत्याचं लग्न 

थोडं पण कामाचं

  • लग्नाच्या एका वर्षातच हा बॉलिवूड कलाकार पत्नीसोबत पटत नसल्यानं राहतोय वेगळा
  • इंस्टाग्रामवरील हनीमूनचे फोटो सुद्धा केले डिलीट
  • दोघांकडून स्पष्टीकरण नाही मात्र स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार दोघंही राहतायेत वेगळे

मुंबई: चित्रपटसृष्टीत विवाह आणि घटस्फोट हे काही नवीन नाहीत. अनेक कलाकारांनी आपलं लग्न अनेक वर्ष टिकवल्याचे उदाहरणही बॉलिवूडमध्ये बघायला मिळतात. पण मागील काही काळामध्ये अनेक कलाकारांनी आपल्या पार्टनरसोबत वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आताच यातील आणखी एक नवीन माहिती येतेय. ही बातमी आहे अभिनेता राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर विषयी. बॉलिवूड अभिनेता प्रतिकनं २३ जानेवारी २०१९ ला आपली लाँगटर्म गर्लफ्रेंड असलेल्या सान्या सागर सोबत लग्न केलं होतं. आता या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची माहिती येतेय.

मीडियामध्ये प्रतिक आणि सान्याबाबत सांगितलं जातंय की, दोघं एकमेकांपासून सध्या वेगळे राहत आहेत. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार प्रतिक आणि सान्या यांच्यातील नात्यात सध्या काही ठीक नाहीय. दोघं अनेक आठवड्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. एव्हढंच नाही याबाबत आणखीही माहिती मिळतेय की, सान्या प्रतिकच्या कुटुंबातील आयोजित कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होत नाहीय. ती त्यापासूनही दूर राहतेय. सान्या बब्बर कुटुंबियांसोबत होळीच्या पार्टीत आणि राज बब्बरच्या डिनर अॅनिव्हर्सरीमध्ये सहभागी झाली नव्हती. तर सान्यानं प्रतिकला आपल्या प्लेमध्ये सुद्धा बोलावलं नव्हतं.

याबाबत आतापर्यंत प्रतिक बब्बर किंवा त्याचे वडील राज बब्बर यांच्याकडून कुठलंही वक्तव्य आलेलं नाहीय. मात्र स्पॉटबॉयनं याबाबत प्रतिकला प्रश्न विचारला तेव्हा त्यानं त्याचं उत्तर देणं टाळलं आणि ‘असं काही नाही’ इतकंच तो बोलला.

आपल्याला माहितीच आहे की, प्रतिक आणि सान्या सागर खूप काळापासून एकमेकांना डेट करत होते. सान्या बीएसपी नेता पवन सागर यांची मुलगी आहे. दोघांचं लग्न सोशल मीडियावर खूप गाजलं होतं. तीन दिवसांपर्यंत चाललेल्या लग्नाच्या कार्यक्रमांची सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू होती. स्पॉटबॉयच्या रिपोर्ट्सनुसार प्रतिकनं आपल्या हनीमूनचे फोटो सुद्धा इंस्टाग्रामवरून काढून टाकलेले आहेत.

यापूर्वीही अनेक कलाकार लग्न झाल्यानंतर पटलं नाही म्हणून वेगळे झालेत. अभिनेता करण ग्रोव्हर यानं दोन विवाह केले ते टिकले नाहीत. अखेर त्यानं तिसऱ्यांदा अभिनेत्री बिपाशा बासू सोबत विवाह केलाय. तसंच अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा अनेक वर्षांच्या आपल्या लग्नानंतर वेगळे झालेत. याच यादीत अभिनेता हृतिक रोशन, अभिनेता अर्जुन रामपाल यांचाही समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी