इक्बाल मिर्ची, बिटकॉईन घोटाळा, IPLसट्टेबाजी; बापरे बाप! राज कुंद्राचे अनेक आहेत गुन्हेगारी राज

बी टाऊन
भरत जाधव
Updated Jul 20, 2021 | 09:20 IST

तुम्हाला माहिती आहे का?  राज कुंद्राचे या गुन्ह्यांप्रमाणे अनेक गुन्हेगारी राज आहेत. नाही ना , तर जाणून घ्या राज कुंद्रा कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

Raj Kundra has many criminal secrets
बापरे बाप! राज कुंद्राचे अनेक आहेत गुन्हेगारी राज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे.
  • राज कुंद्रा यांचे नाव याआधी आयपीएलच्या सट्टेबाजी प्रकरणातही समोर आले होते.
  • ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून व्यापाऱ्याची फसवणूक राज कुंद्रा यांनी केली आहे.

मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai crime branch) सोमवारी (19 जुलै) रात्री उशीरा अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे (Actor Shilpa Shetty) पती व्यावसायिक  राज कुंद्रा (Raj Kundra) यांना अटक केली आहे.  राज कुंद्रा (Raj Kundra arrested in Pornography case) यांना पॉर्नोग्राफीच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कु्ंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. पण तुम्हाला माहिती आहे का?  राज कुंद्राचे या गुन्ह्यांप्रमाणे अनेक गुन्हेगारी राज आहेत. नाही ना , तर जाणून घ्या राज कुंद्रा कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ते अशाप्रकारच्या वादात सापडलेले आहेत. आज आपण त्याच प्रकरणांविषयी जाणून घेणार आहोत.. 

 IPL ची सट्टेबाजी  …

राज कुंद्रा यांचे नाव याआधी आयपीएलच्या सट्टेबाजी प्रकरणातही समोर आले होते. त्यांना हयात असेपर्यंत क्रिकेटपासून दूर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले. तर राजस्थान रॉयल्सचे ते सहमालक होते मात्र या संघावरही दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. 2013 साली आयपीएल सट्टेबाजी प्रकरणावरून राजस्थान रॉयल्सचे सह-मालक राज कुंद्रा यांचे निलंबन करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या नवी दिल्लीतील बैठकीत घेण्यात आला होता. त्यांच्यावर गरज पडल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत बीसीसीआयकडून याआधीच देण्यात आले होते. राजस्थान रॉयल्सचे हिस्सेदार कुंद्रा यांनी सट्टेबाजी केल्याची कबुली दिल्याचे दिल्ली पोलिसांनी जाहीर केल्यानंतर बीसीसीआयचे तत्कालीन हंगामी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.

“राज कुंद्रा प्रकरणावर बैठकीत सखोल चर्चा झाली, त्यानंतर कुंद्रा आरोपांतून मुक्त होईपर्यंत त्यांना निलंबित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच ते निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्यास त्यांना पुन्हा आपली पत मिळवता येईल”, असं सांगण्यात आले. कुंद्रावरील आरोप सिद्ध झाल्यास राजस्थान रॉयल्सची आयपीएलमधून हकालपट्टी करण्यात येईल. हे संकट टाळण्यासाठी संघ व्यवस्थापनाने आधीच कुंद्रापासून अंतर ठेवण्यास प्रारंभ केल्याचे दिसून आले होते. तसेच नियमांचा भंग केल्यास कुंद्रा यांना आपली भागीदारी गमवावी लागेल, असे राजस्थान रॉयल्सकडून स्पष्ट करण्यात आले होते.

ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून फसवणूक

2017 मध्येही घोटाळ्यासंदर्भात राज कुंद्रांचे नाव चर्चेत आले होते. कारण ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याला लाखो रुपयांना गंडा घातल्या प्रकरणात त्यांचे आणि शिल्पा शेट्टीचे नाव चर्चेत आले होते. शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि त्यांच्या तीन साथीदारांविरोधात या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
बेस्ट डील टीव्ही कंपनीच्या माध्यमातून विविध कंपनीचे प्रोडक्ट विक्रीचा ऑनलाइन शॉपिंगचा व्यवसाय उद्योगपती राज कुंद्रा यांनी पत्नी शिल्पा शेट्टीच्या नावाने सुरू केला होता. व्यवसायात नफा व्हावा, यासाठी रवी मोहनलाल भालेरीया या व्यापाऱ्याने बेस्ट डील टीव्ही कंपनीमार्फत 5 कोटी रुपयांच्या बेडशीटची ऑर्डर घेतली होती. या व्यवहारात 23 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे, असा आरोप भालेरीया यांनी केला होता. याप्रकरणी शिल्पा शेट्टी, तिचा पती राज कुंद्रा, दर्शित शाह, उदय कोठारी, वेदांत विकास बल्ली यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

2017 साली सचिन जोशीसोबत वाद…

आयपीएल राजस्थान रॉयलचे पूर्व मालक राज कुंद्रा आणि अभिनेता सचिन जोशी यांनी एकमेकांवर फसवणुकीचा आरोप केला होता. राजने 2017ला पोकर लीगची स्थापना केली होती. या लीगचा सचिनही एक भाग होता. इंडियन पोकर लीगमध्ये सचिनची टीम होती. त्याच्या टीमची तेव्हा मोठ्या प्रमाणात चर्चाही झाली होती. पण या लीगमध्ये त्याने कोणतेही पैसे भरले नाही. सचिनने 40 लाखांचा एक धनादेश दिला होता, जो नंतर बाऊन्स झाला असा आरोप राज यांनी केला होता. सचिन जोशीने राजच्या या आरोपांना उत्तर देताना म्हटले की, राजने या लीगमध्ये गैरव्यवहर केले. या लीगमध्ये कोणती टीम जिंकणार हे त्याने आधीच ठरवले होते. जेव्हा जोशीला याबद्दल माहित पडले तेव्हा त्याने या लीगमधून काढता पाय घेतला. 

बिटकॉईन घोटाळा

बिटकॉईन घोटाळ्यात राज कुंद्रांना ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने 2018 साली समन्स बजावले होते. दोन हजार कोटींचा हा बिटकॉईन घोटाळा असण्याचे सांगण्यात आले होते. समन्स जारी केल्यानंतर 5जून 2018 रोजी राज कुंद्रांनी ईडीचे कार्यालय गाठले होते. राज कुंद्रांची कसून चौकशी करण्यात आली. या प्रकरणातला मुख्य आरोपी अमित भारतद्वाज अटकेत आहे. बिटकॉईन घोटाळा प्रकरण मनी लॉन्डरिंगशी संबंधित आहे. त्याच अनुषंगाने राज कुंद्राची चौकशी झाल्याचे आणि त्याचा जबाब नोंदवून घेण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले होते. गेट बिटकॉन्स डॉट कॉम या नावे एका वेबसाईटची निर्मिती करण्यात आली. एवढेच नाही तर या वेबसाइटद्वारे हजारो लोकांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात राज कुंद्रा यांचेही नाव समोर आल्याने त्यांची चौकशी करण्यात आल्याचे ईडीने म्हटले होते.

इक्बाल मिर्ची कनेक्शन

2019 मध्ये ऑक्टोबर महिन्यात इक्बाल मिर्ची कनेक्शन प्रकरणात राज कुंद्रा यांना ईडीने समन्स बजावले होते. राज कुंद्रा यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला होता. इक्बाल मिर्ची या कुख्यात गुंडासोबत राज कुंद्रा यांनी व्यावसायिक करार केल्याचा संशय ईडीने व्यक्त केले होता, त्यामुळेच राज कुंद्रांना चौकशीला बोलवण्यात आले होते.इक्बाल मिर्चीचा साथीदार रंजीत सिंघ बिंद्रासोबत राज कुंद्रांनी हा व्यावसायिक करार केल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली होती. रंजित बिंद्रा इक्बाल मिर्चीसाठी काम करतो असा आरोप आहे त्याचमुळे राज कुंद्रा यांच्या अडचणींमध्ये भर पडली. मात्र राज कुंद्रा यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.

आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तपशिलांची पडताळणी करत असताना ईडीला राज कुंद्रा यांच्यासंदर्भातली माहिती आढळली. कारण या पडताळणीत इसेन्शिअल हॉस्पिटॅलिटी लिमिटेड कंपनीचे नाव समोर आले. ही कंपनी राज कुंद्रा यांच्या मालकीची आहे तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी या कंपनीची संचालक असल्याचे समोर आले होते. दरम्यान 2011 मध्ये मी एक जमीन आणि कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना विकली होती. एअरपोर्टच्या जवळ असलेल्या या जमिनीचे सगळे कागद माझ्या सीएने तपासले आहेत. त्यानंतर या कंपनीशी माझा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण राज कुंद्रा यांनी दिले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी