मिथुन चक्रवर्ती भाजपच्या वाटेवर...

RSS chief meets Mithun Chakraborty मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (७०) यांची भेट घेतली.

RSS chief meets Mithun Chakraborty
मिथुन चक्रवर्ती भाजपच्या वाटेवर... 

थोडं पण कामाचं

  • मिथुन चक्रवर्ती भाजपच्या वाटेवर...
  • डाव्यांशी जवळीक असलेले मिथुन चक्रवर्ती
  • पश्चिम बंगालमध्ये भाजपचे १८ खासदार

मुंबई: पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असे राजकारण रंगले आहे. हे राजकारण रंगात असतानाच मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (७०) यांची भेट घेतली. ही भेट मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्या मुंबईतील बंगल्यावर झाली. याआधी मिथुन चक्रवर्ती यांनी नागपूरमध्ये जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. या भेटीत मिथुन चक्रवर्ती यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना मुंबईच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. (RSS chief meets Mithun Chakraborty)

पश्चिम बंगालमध्ये याच वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. लवकरच निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्ष आपापली तयारी करण्यात गुंतले असताना सरसंघचालक मोहन भागवत आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यात दोन भेटी झाल्या. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरत आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबतच्या बैठकीविषयी विचारले असता मिथुन चक्रवर्ती यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मोघम उत्तर दिले. 'सरसंघचालकांचा मी आदर करतो आणि त्यांचे माझ्यावर प्रेम आहे, यामुळेच आमच्या भेटी झाल्या. या भेटींचा राजकारणाशी संबंध नाही', असे मिथुन चक्रवर्ती यांनी सांगितले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आमंत्रण दिल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी राजकारणात प्रवेश केला होता. ते तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेवर गेले होते. पण सभागृहात सतत गैरहजर राहिल्यामुळे पक्षांतर्गत मिथुन चक्रवर्ती यांच्याविषयी नाराजी वाढत गेली. अखेर मिथुन चक्रवर्ती यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. याआधी वर्षभरापूर्वी शारदा चिटफंड घोटाळ्यात मिथुन चक्रवर्ती यांच्या नावाची चर्चा झाली होती. मिथुन चक्रवर्ती शारदा चिटफंडचे ब्रँड अॅम्बॅसिडर होते. पण घोटाळ्यात नाव आल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांची राज्यसभेतील गैरहजेरी वाढली. काही काळानंतर सक्तवसुली संचालनालयाने मिथुन चक्रवर्ती यांची चौकशी केली. या चौकशीनंतर मिथुन चक्रवर्ती यांनी स्वेच्छेने १ कोटी २० लाख रुपये जमा करुन कोणाची फसवणूक करण्याची इच्छा नाही, असे सांगितले होते.

राज्यसभेच्या सदस्यत्वाचा २०१६च्या अखेरीस राजीनामा दिल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी राजकारणापासून दूर राहणे पसंत केले. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबतच्या दोन भेटींमुळे मिथुन चक्रवर्ती भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. 

डाव्यांशी जवळीक असलेले मिथुन चक्रवर्ती

तरुणपणी मिथुन चक्रवर्ती यांची डाव्यांशी जवळीक होती. पश्चिम बंगालचे क्रीडामंत्री आणि डाव्या विचारांचे ज्येष्ठ नेते सुभाष चक्रवर्ती यांच्याशी मिथुन चक्रवर्ती यांचे सलोख्याचे संबंध होते. याच कारणामुळे तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मिथुन चक्रवर्ती यांच्या कृतीविषयी पश्चिम बंगालमध्ये अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे १८ खासदार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी २०२१ मध्ये होणार असलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने तिसऱ्या टर्मसाठी रिंगणात उतरतील. ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांचा प्रयत्न सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्याचा असेल तर भाजपचा प्रयत्न सत्ता मिळवण्यासाठी असेल. 

लोकसभेसाठी २०१९मध्ये (Lok Sabha 2019 Election) झालेल्या निवडणुकीत ऐतिहासिक घटना घडली. तृणमूल काँग्रेसने (All India Trinamool Congress - TMC) २२ तर भाजपने (Bharatiya Janata Party - BJP) १८ जागांवर विजय मिळवला आणि काँग्रेसला दोन जागांवर विजय मिळाला. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच भाजप हा पश्चिम बंगालमधील मुख्य विरोधी पक्ष असल्याचे चित्र उभे राहिले. 

ज्या भाजपला पश्चिम बंगालमध्ये डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमुळे संधी मिळत नव्हती त्यांना लोकसभा निवडणुकीत एकदम ४२ पैकी १८ जागांवर विजय मिळाला. या विजयानंतर उत्साह वाढलेल्या भाजपने जनहिताच्या मुद्यांवर आक्रमक भूमिका घ्यायला सरुवात केली. नागरिकांचा भाजपला पाठिंबा मिळू लागला. भाजपला मिळणारे समर्थन वाढू लागताच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात उघड संघर्ष सुरू झाला. मागील काही महिन्यात पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या सक्रीय कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. या घटनेनंतरही भाजपचे राज्यातील काम सुरू आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांचे पश्चिम बंगालचे दौरे वाढले आहेत. यामुळे भाजप आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस यांच्यात राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे २०२१ दरम्यान विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता

पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे २०२१ दरम्यान विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. काही आठवड्यांपूर्वी निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व पक्षांच्या प्रतिनिधींशी निवडणूक नियोजनाबाबत प्राथमिक चर्चा केली होती. या चर्चेनंतर राज्यातील राजकीय वाऱ्यांचा वेग वाढला आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप यांनी पश्चिम बंगालचे वातावरण ढवळून निघत आहे. या वातावरणात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत सुमारे एक तास चर्चा झाली.

आयसीसीमध्ये गांगुली-शहा जोडी भारताचा चेहरा म्हणून काम करणार

याआधी बीसीसीआयची ८९वी सर्वसाधारण सभा गुजरातमध्ये अहमदाबाद येथे पार पडली. सर्वसाधारण सभेत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सरचिटणीस जय अमित शहा या दोघांनी आयसीसीचे संचालक आणि भारताचे प्रतिनिधी म्हणून काम करावे असे ठरले. आयसीसीमध्ये गांगुली-शहा जोडीने भारताचा चेहरा म्हणून काम करावे असे सर्वसाधारण सभेत ठरवण्यात आले. जय शहा हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव आहेत. विशेष म्हणजे गांगुली आणि अमित शहा यांची काही महिन्यांपूर्वी भेट झाली होती. ही सदीच्छा भेट असल्याचे दोघांकडून सांगण्यात आले पण या भेटीतील चर्चेविषयी अधिकृतरित्या जास्त माहिती देणे टाळण्यात आले होते. या सगळ्या घडामोडींचा एकमेकांशी संदर्भ जोडला जात आहे. सौरव गांगुली भविष्यात भाजपकडून राजकारणात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. 

'बंगाल की माटी का' मुख्यमंत्री देणार, अमित शहांची पश्चिम बंगालमध्ये घोषणा

काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी राज्याला 'बंगाल की माटी का' मुख्यमंत्री देणार असल्याचे जाहीर केले. यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांची सदिच्छा भेट घेतली. गांगुली-राज्यपाल भेटीच्या काही आठवड्यांनंतर सरसंघचालक मोहन भागवत आणि मिथुन चक्रवर्ती यांची मुंबईत भेट झाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी